छत्रपती शिवरायांच्या अप्रकाशित पत्रांचा शोध
By admin | Published: April 19, 2015 01:11 AM2015-04-19T01:11:31+5:302015-04-19T01:11:31+5:30
अनेक पैलूंवर नवा प्रकाश टाकणारी महाराजांची आठ अप्रकाशित पत्रे जनतेसमोर
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांची आग्ऱ्याहून सुटका, विशाळगड किल्ल्याच्या कारभाराची माहिती, दक्षिण दिग्विजयात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या रघुनाथ पंडित यांना वतन इनाम, शिवरायांचे काका त्र्यंबकजी भोसले यांना इनाम, जयकृष्ण व जयराम चोबे यांना वर्षासन दिल्याचे आज्ञापत्र, तृतीयपंथीयांना सनद अशा विविध विषयांवर शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या आठ अप्रकाशित पत्रांचा शोध लागल्याची माहिती शनिवारी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, गतवर्षी शिवछत्रपतींच्या दुसऱ्या मुद्रेचे संशोधन मांडल्यानंतर यंदा शिवचरित्रातील अनेक पैलूंवर नवा प्रकाश टाकणारी महाराजांची आठ अप्रकाशित पत्रे जनतेसमोर आणत आहे. या पत्रांमुळे शिवचरित्र लेखन संशोधनात महत्त्वाची भर पडणार आहे. शिवाजी महाराजांचे १४ मार्च १६७१ रोजीचे विशाळगडासंदर्भात पहिलेच पत्र मिळते.
त्यात दुधोजी आहिरराऊ हे हवालदार होते, याची माहिती मिळते. १५ एप्रिल १६७१ चे विशाळगडावरील कदीम तैनातीबद्दलचे पत्र, दक्षिण दिग्विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रघुनाथ पंडित यांना १५ एप्रिल १६७१ ला इनाम दिलेले पत्र, त्र्यंबकजी भोसले या शिवरायांच्या काकांनी कुतूबशहाबरोबर झालेल्या राजकारणात बजावलेली भूमिका व त्यांना शिवरायांची वतने देण्याबाबतचे २६ सप्टेंबर १६७७ व १६७८ चे पत्र मिळाले आहे.
सैन्याच्या सरंजामासाठी गावे लावून देताना त्या प्रदेशातील गडकोट मध्यवर्ती सत्तेच्या हाताखाली ठेवण्याच्या आज्ञापत्रात आलेल्या धोरणाचा खुद्द शिवाजी महाराजांच्या पत्रात आलेला उल्लेख व आज्ञापत्र आहे.
तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिलेली सनद, वर्षासनाचे आज्ञापत्र तसेच मालोजी घोरपडे यांना शिवाजी महाराजांनी दिलेल्या पत्राची एक तालिका कोल्हापूरच्या दप्तरखान्यात आहे. अशाप्रकारे ही आठ पत्रे आम्हाला कोल्हापूर रेकॉर्ड आॅफिसमधील वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये व शाहू संशोधन केंद्राच्या आप्पासाहेब पवार यांनी जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये सापडली आहेत.
ही पत्रे शोधण्याची प्रेरणा आम्हाला डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या १९४५ साली इंडियन हिस्ट्री कमिशनला लिहिलेल्या एका पत्रामुळे मिळाली. परिषदेस वसंतराव मुळीक, पुराभिलेखागार कार्यालयाचे गणेश खोडके, मोडी अभ्यासक अमित आडसुळे, उत्तम नलवडे, ओंकार कोळेकर, राहुल शिंदे, विक्रमसिंह पाटील, पवन निपाणीकर, दिगंबर भोसले, अवधूत पाटील, राम यादव व सुनील मुळे उपस्थित होते.
२५ दिवसांचा दावा चुकीचा
या आठ पत्रांमध्ये सर्वांत महत्त्वाचे पत्र आहे, ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटकेचे. महाराज १७ आॅगस्ट १६६६ रोजी आग्ऱ्याहून निसटले आणि २२ नोव्हेंबर रोजी ते राजगडावर पोहोचले. ३ आॅक्टोबरला त्यांनी जयकृष्ण चोबे या पुजाऱ्यांना वर्षासन दिले आहे. ५ मार्च १६६७ रोजी या कागदावर विराजितेचे मोर्तब करून दिले. या पत्रामुळे शिवाजी महाराज आग्ऱ्याहून सुटल्यानंतर ४७ दिवस मथुरेतच होते, हे सिद्ध होते. त्यामुळे शिवाजी महाराज २५ दिवसांत राजगडावर पोहोचले, हा दावा फोल ठरतो.
निष्क्रिय शिवाजी विद्यापीठ
ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची सध्या फक्त २५२ पत्रे उपलब्ध आहेत. खरे तर महाराजांच्या नावे चालणाऱ्या या विद्यापीठात तीन प्रमुख केंद्रे चालविली जातात. त्यांच्याकडून या पत्रांचे व इतिहासकालीन कागदपत्रांचे संकलन करणे अपेक्षित होते. आजवर आम्ही जे काही संशोधन मांडले, शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या मुद्रेची माहिती जगासमोर आणली, त्या कशाचीच दखल घ्यावी, असे या व्यवस्थेला वाटले नाही. महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांची १५ पत्रे पुस्तकरूपात प्रकाशित केली, त्यांत अक्षम्य चुका आहेत. गेली दोन वर्षे आम्ही ते पुस्तक मागे घ्यावे, यासाठी पाठपुरावा करीत आहोत; पण त्यांचीही तयारी नाही.