टोलबाबत चर्चेस वेळ द्यावा
By admin | Published: November 5, 2014 12:28 AM2014-11-05T00:28:47+5:302014-11-05T00:30:44+5:30
कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र : ‘शब्द’ पाळण्याची विनंती
कोल्हापूर : भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ उचगाव येथे घेतलेल्या सभेत कोल्हापूर टोलमुक्त करण्याचे दिलेले आश्वासन पाळावे, कोल्हापूरकरांची नेमकी मागणी व या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळास वेळ द्यावा, अशी मागणी आज, मंगळवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्यावतीने ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व निमंत्रक निवास साळोखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. हे पत्र कृती समितीने एक नोव्हेंबरलाच मुख्यमंत्री कार्यालयास पाठविले आहे.
पत्रात म्हटले आहे, ‘कोल्हापूरच्या अन्यायी टोल प्रश्नाबाबत आपणास पुरेपूर माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुम्ही कोल्हापूरकरांना टोलमुक्तीचे आश्वासन दिले. यासाठी भाजपला जनतेने मतदान करण्याचे आवाहनही केले होते. याप्रमाणे भाजपला जनतेने निवडून देत, राज्यातील सत्ताही दिली आहे. कोल्हापूरकरांच्या सुदैवाने टोलमुक्तीच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आपणाकडेच राज्याची सत्तासूत्रे आली आहेत. त्यामुळे कोल्हापूरला टोलमुक्त करून न्याय द्याल, असा विश्वास आहे.’
आघाडी शासनाच्या काळात साडेचार वर्षे कोल्हापूरकरांनी विविध मार्गांनी आंदोलने केली. अजूनही या प्रश्नासाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरत आहेत. या आंदोलनास पूर्णविराम देण्यासाठी ‘टोलमुक्त कोल्हापूर’ हाच पर्याय आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिष्टमंडळास भेटीसाठी आपल्या सोयीची वेळ द्यावी, कोल्हापूरकरांचे रास्त मागणे ऐकून घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या पत्रात केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३१ आॅक्टोबरला पदाची शपथ घेतली. त्यानंतर १ नोव्हेंबरला दुपारी मुंबईतील मंत्रालयात हे पत्र पाठविले आहे. पत्र रजिस्टर्ड व मेलही केले आहे. ते सचिवांपर्यंत पोहोचले आहे. मुख्यमंत्री नागपूरहून आल्यानंतर याबाबत उत्तर अपेक्षित आहे.
- निवास साळोखे,
(निमंत्रक कृती समिती)