पदाधिकारी निवडीवेळी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:54+5:302021-07-15T04:17:54+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीनंतर सभागृहामध्ये अधिकारी का आले नाहीत, याची चर्चा आता सुरू झाली आहे. राजवर्धन निंबाळकर ...

Discussion of absence of officers during election of office bearers | पदाधिकारी निवडीवेळी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची चर्चा

पदाधिकारी निवडीवेळी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची चर्चा

Next

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीनंतर सभागृहामध्ये अधिकारी का आले नाहीत, याची चर्चा आता सुरू झाली आहे. राजवर्धन निंबाळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनीही हा विषय गांभीर्यांने घेतला असून, याबाबत त्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्याकडे विचारणा केली आहे.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीनंतर एकदा का पीठासन अधिकारी निवड प्रक्रिया पूर्ण करून निघून गेले की, त्यानंतर जिल्हा परिषदेचे अधिकारी सभागृहात येतात आणि नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतात, अशी पद्धत आहे. परंतु अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नंतरच्या सभापती निवडीवेळीही अधिकारी उपस्थित नसल्याने भाजपचे सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

सोमवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते. त्यांनी नूतन अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे अभिनंदन केले. परंतु सभागृहातील निवड प्रक्रिया संपली आहे, असा निरोपच न गेल्याने अन्य खाते प्रमुख सभागृहात आलेच नाहीत. यातील अनेक अधिकारी जवळपास थांबून होते; परंतु माहिती न मिळाल्याने सर्वजण बाहेर थांबले.

मंगळवारीही हाच प्रकार घडला. खुद्द चव्हाण हे निवड प्रक्रिया झाली की सभागृहात येऊन नूतन चारही सभापतींचे अभिनंद करणार होते. त्यासाठी ते निरोपाच्या प्रतीक्षेत होते. परंतु निवड झाल्याचा त्यांना निरोपच मिळाला नाही. ते जिल्हा परिषदेत येईपर्यंत निवडी होऊन, भाषणेही झाली. जिल्हा परिषदेच्या प्रवेशदारात गर्दीतच मग चव्हाण यांनी या चारही पदाधिकाऱ्यांच्या पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. याबाबत त्यांनी मनीषा देसाई यांच्याकडे चौकशी केली. मी तुमच्या निरोपाची वाट पाहत होतो. तो वेळेत दिला असता तर सभागृहातच अभिनंदन करता आले असते, असे ते म्हणाले. या वेळी सामान्य प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून तसा प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात निरोप दिला असल्याचे देसाई यांनी सांगितले. तसेच निवड प्रक्रिया सुरू असताना अन्य अधिकारी सभागृहात उपस्थित नसतात, असेही त्या म्हणाल्या.

चौकट

अधिकाऱ्यांची धावाधाव

सभागृहातच नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करता न आल्याने मग नंतरच्या तासाभरात आपापल्या समित्यांच्या सभापतींचे अभिनंदन करताना अधिकाऱ्यांची धावाधाव झाली. सभापती नेमके कुठे आहेत अशी विचारणा करून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अधिकारी पोहोचले.

Web Title: Discussion of absence of officers during election of office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.