दोन्ही काँग्रेस एकत्रित येण्यासाठी ‘पी.एन.-मुश्रीफ’ यांच्यात चर्चा
By admin | Published: April 23, 2015 12:52 AM2015-04-23T00:52:43+5:302015-04-23T00:55:01+5:30
जिल्हा बँक : मुश्रीफ आज विनय कोरे यांच्याशी चर्चा करणार
कोल्हापूर : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात बुधवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. यामध्ये जिल्हा बँकेत एकत्र येण्यावर चर्चा झाली आहे. जनसुराज्य पक्षाला सोबत घेण्यासाठी आज, गुरुवारी माजी मंत्री विनय कोरे व सतेज पाटील यांची हसन मुश्रीफ भेट घेणार आहेत.
जिल्हा बॅँकेसाठी शुक्रवारी माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पॅनेल बांधणीच्या कामाला वेग आला आहे. कॉँग्रेसचे नेते ‘गोकुळ’च्या निवडणुकीत गुंतल्याने चर्चेला उशीर झाला असून मंगळवारी आमदार महादेवराव महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्यात चर्चा झाली होती. त्यानंतर बुधवारी पी. एन. पाटील, आमदार मुश्रीफ, के. पी. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यामध्ये दोन्ही कॉँग्रेसने एकत्रित निवडणूक लढवावी, या विषयावर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये या विषयावर सकारात्मक चर्चा झाली. विकास सेवा संस्था प्रतिनिधीमध्ये कोणी कोणत्या तालुक्यात निवडणूक लढवायची याबाबतही प्राथमिक चर्चा झाली असून जागावाटपाबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यावर चर्चा झाल्याचेही समजते. गुरुवारी दुपारी चार वाजता पुन्हा पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक व आमदार मुश्रीफ यांच्यात चर्चा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता आमदार मुश्रीफ हे कोरे व सतेज पाटील यांची भेट घेणार आहेत.