कोल्हापूर महापालिकेत स्वबळासाठी जोर-बैठका, सर्वच पक्षांत चर्चा; सतेज पाटील-हसन मुश्रीफ दुरावणार?
By भारत चव्हाण | Published: December 2, 2024 05:41 PM2024-12-02T17:41:17+5:302024-12-02T17:41:55+5:30
भाजपची तयारी जोरात
भारत चव्हाण
कोल्हापूर : महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक आघाडी करून लढायची की स्वतंत्र लढायची, याबाबत महायुती आणि महाविकास आघाडीत गोंधळ असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी सर्वच निवडणुकीत राजकीय पक्षांनी स्वतंत्र लढून नंतर महापालिकेत आघाडी केली. परंतु, यावेळी मात्र कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या असल्याने प्रत्येकाला निवडणूक लढवायची आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेण्यापेक्षा स्वतंत्र लढलो तर काय होईल, याची चाचपणी महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांची नेतेमंडळी करत आहेत.
महायुतीत भाजपसह शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आरपीआर आठवले गट यांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, उद्धवसेना, आम आदमी पार्टी तसेच डाव्या पक्षांचा समावेश आहे. महापालिकेच्या प्रभागांची संख्या मर्यादित असणार आहे. शिवाय सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांचे उमेदवारीबाबत समाधान होण्याची शक्यता फारच कमी आहे. म्हणूनच आघाडी करून लढल्यास कार्यकर्त्यांची नाराजी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
२०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात आघाडी झाली होती. तर भाजप व ताराराणी आघाडी यांची युती झाली होती. आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांनी महापालिकेत सत्ता स्थापन केली. आता राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात फूट पडली आहे. हसन मुश्रीफ भाजपसोबत गेल्याने तसेच राजेश क्षीरसागर शिंदेसेनेसोबत गेल्याने मागचे सर्व संदर्भ बदलले आहेत. पुढील काळात सतेज पाटील, हसन मुश्रीफ व राजेश क्षीरसागर महापालिकेत एकत्र येण्याची शक्यता कमी आहे.
आगामी निवडणूक स्वतंत्र लढायची की आघाडी करून लढायची, याबाबत सर्वच पक्ष चाचपणी करू लागले आहेत. भाजप तर सर्व जागा लढवण्याबाबत आग्रही आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने लागल्यानंतर भाजपचे नेते, कार्यकर्ते उत्साहात आहेत. स्वतंत्र लढण्यावर स्थानिक नेते ठाम आहेत. शिंदेसेनेचा निर्णय राजेक्ष क्षीरसागर घेणार आहेत. काँग्रेस अद्याप पराभवाच्या धक्क्यातून सावरलेली नाही. त्यामुळे त्यांनी आपले पत्ते अजून खोललेले नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दि. ७ डिसेंबर रोजी कोल्हापुरात येणार आहेत, त्यावेळी त्यांची महापालिका निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.
भाजपची तयारी जोरात
विधानसभेवर घवघवीत यश मिळवल्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबईत दि. २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत तशा स्पष्ट सूचना दिल्याचे सांगितले जाते. प्रभागनिहाय कोण निवडून येऊ शकतो, दुसऱ्या पक्षातून आपल्याकडे यायला कोण तयार आहे, याची यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.
ताराराणी आघाडी रिंगणात नसणार
माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी स्थापन केलेली ताराराणी आघाडी यावेळी निवडणूक रिंगणात असण्याची शक्यता कमी आहे. संपूर्ण महाडिक कुटुंबच भाजपमध्ये सामील झाले आहे. या आघाडीचे गटनेते सत्यजीत कदम यांनी भाजपमधून शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ताराराणी आघाडीऐवजी महाडिक यांना भाजपच्या प्रचारात भाग घ्यावा लागणार आहे.
सतेज पाटील, मुश्रीफ दुरावणार?
हसन मुश्रीफ गेल्या काही वर्षांपासून सतेज पाटील यांच्यासोबत महापालिकेत सत्तेत आहेत. यावेळी मात्र या दोघांवर पक्षीय बंधनांचा दबाव असणार आहे. जरी ते स्वतंत्र लढले तरी निवडणुकीनंतरही ते एकत्र येतील का? याबाबत शंका आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे २५ उमेदवार तयार
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या २५ उमेदवारांची यादी तयार आहे. अजित पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ काय सांगतील, त्याप्रमाणे मोठ्या ताकदीने निवडणुकीला सामोरे जाण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी सांगितले.