भाजप-स्वाभिमानीची चर्चा फिसकटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2017 12:55 AM2017-02-04T00:55:09+5:302017-02-04T00:55:09+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक; कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राजू शेट्टी यांची स्वबळाची भाषा
कोल्हापूर : राज्यामध्ये सत्तेत सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापुरात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये सकाळी चर्चा झाली होती. मात्र, दिवसभर कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर शेट्टी यांनी स्वबळाचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
गेले तीन दिवस मंत्री पाटील आणि शेट्टी यांच्यामध्ये युतीबाबत चर्चा होणार असल्याच्या बातम्यांमुळे ‘स्वाभिमानी’च्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यानुसार पाटील, शेट्टी आणि विनय कोरे यांच्यामध्ये चर्चा झाली. कोरे यांनी चर्चा यशस्वी झाल्याचे सांगितले; मात्र शेट्टी यांनी जागांचा मेळ बसत नसल्याने संध्याकाळी आणखी एक बैठक होईल, असे सांगितले होते. मंत्री पाटील यांनीही रात्री उशिरापर्यंत बैठक होऊन निर्णय होईल, असे सांगितले होते. मात्र अशी बैठक झाली नसल्याचे सांगण्यात आले.
कोरे, पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर शेट्टी यांनी ‘स्वाभिमानी’च्या जिल्हा कार्यालयात प्रामुख्याने शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यानंतर सायंकाळी कार्यकर्त्यांचा स्वबळासाठी आग्रह असल्याचे पत्रक स्वाभिमानीने प्रसिद्धीस दिले. हा सर्व घटनाक्रम पाहता शुक्रवारची ही चर्चा फिसकटली असून, ‘स्वाभिमानी’ स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तत्पूर्वी सकाळी साडेअकराच्या सुमारास मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विनय कोरे आणि राजू शेट्टी यांचे रेसिडेन्सी क्लब येथे आगमन झाले. त्यानंतर सुमारे दीड तास या तिघांमध्ये चर्चा झाली. अगदी तालुकावार, मतदार संघांनुसार चर्चा झाली. बैठकीनंतर कोरे पहिल्यांदा बाहेर पडले. त्यांनी चर्चा यशस्वी झाल्याचे सांगितले. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि राजू शेट्टी याबाबत घोषणा करतील, असेही ते जाताना सांगून गेले.
त्यानंतर शेट्टी बाहेर आले. त्यांनी जागांचा मेळ लागणे अवघड असल्याचे सांगत मी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही, असे सांगून ते निघून गेले. संध्याकाळी पुन्हा बसणार आहोत, असे सांगून त्यांनी चर्चेची तयारी दर्शविली होती. त्यानंतर थोड्या वेळाने मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सत्तेतील नैसर्गिक पक्ष म्हणून शिवसेना सोबत हवी होती. मात्र, त्यांनी मुंबईतूनच स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. मग स्वाभिमानी सोबत असावी यासाठी चर्चा सुरू आहे. संध्याकाळी पुन्हा बसणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, परशुराम तावरे, जगदीश लिंग्रज, महापालिकेतील भाजप गटनेता विजय सूर्यवंशी, नाना कदम उपस्थित होते.
.....................
आरपीआय आठवले गटाशी चर्चा
दरम्यान, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आणि प्रा. शहाजी कांबळे यांनी मंत्री पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. आठवले गटाने सांगरूळ, सरवडे व उचगांव या तीन जिल्हा परिषदेच्या जागा आणि पंचायत समितीच्या १२ जागांची मागणी केली आहे.
अखेर संध्याकाळी बैठक झालीच नाही
चर्चेची पहिली फेरी झाली आहे. जुळवाजुळवी सुरू आहे. संध्याकाळी पुन्हा बसणार आहोत असे चंद्रकांतदादा पाटील आणि राजू शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र दुपारनंतर मंत्री पाटील हे तासगावला गेले तर संध्याकाळी मुलाखती आटोपून शेट्टी हे सांगलीमध्ये बैठकीला गेले. त्यामुळे संध्याकाळी होणारी बैठक झालीच नाही आणि स्वाभिमानीकडून स्वबळाची कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे पत्रकच काढण्यात आले.
अन्य तालुक्यांत युती शक्य
स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपच्या मागे फरफटत गेली नाही, हे स्पष्ट करण्यासाठी शिरोळ, हातकणंगले येथे ‘स्वाभिमानी’ने स्वतंत्र लढायचे आणि अन्य तालुक्यांत भाजपला सहकार्य करायचे, असाही प्रस्ताव अंतिम टप्प्यात पुढे येऊ शकतो.
भाजपमध्ये राष्ट्रवादीसह अन्य पक्षांतून अनेकांनी प्रवेश केला आहे, तो उमेदवारी मिळविण्यासाठीच केला आहे; परंतु त्यामुळे गेली पंधरा वर्षे ‘स्वाभिमानी’चा कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर उतरून संघर्ष केलेल्या कार्यकर्त्याला मी वाऱ्यावर सोडू शकत नाही. आम्ही २२ जिल्हा परिषदेच्या आणि ४४ पंचायत समितीच्या जागा मागितल्या आहेत. मात्र मेळ लावणं अवघड आहे. माझ्या एका-एका कार्यकर्त्याला मी निवडून आणणार आहे.
- खासदार राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी पक्ष