चंद्रकांत पाटील यांच्या अतिशयोक्तिपूर्ण वक्तव्यांची चर्चा- स्वत:च्याच जिल्ह्यात युतीला झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 11:16 AM2019-10-25T11:16:49+5:302019-10-25T11:19:20+5:30
राज्यात युतीच्या २५० जागा येणार, कोल्हापूरच्या युतीच्या १० ही जागा निवडून येणार, कोथरूडला दीड लाखावर लीड घेणार, अशी भाषणे पाटील यांनी केली होती; परंतु यातील त्यांचे एकही म्हणणे खरे ठरले नाही.
कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अतिशयोक्तिपूर्ण वक्तव्ये, परिणामी चवताळून उठलेली राष्ट्रवादी कॉँग्रेस, कोल्हापूर जिल्ह्यातच शिवसेनेला दणका देण्यासाठी ‘जनसुराज्य’चा वापर या सगळ्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच युतीला जोरदार झटका बसला असून, भाजपनेही आपल्या दोन्ही जागा गमावल्या आहेत.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना ‘लक्ष्य’ करून आपली जाहीर मते मांडली आहेत. त्यामुळेच ‘आधी लोकांतून निवडून या’ हे पवारांचे आव्हान स्वीकारण्यासाठी पाटील कोथरूडमधून उभे राहिले. परिणामी त्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले, ही वस्तुस्थिती आहे.
राज्यात युतीच्या २५० जागा येणार, कोल्हापूरच्या युतीच्या १० ही जागा निवडून येणार, कोथरूडला दीड लाखावर लीड घेणार, अशी भाषणे पाटील यांनी केली होती; परंतु यातील त्यांचे एकही म्हणणे खरे ठरले नाही. उलट त्यांच्या या वक्तव्यांमुळे शरद पवार यांना सहानुभूती मिळत गेल्याचे चित्र आले.
कोल्हापूर जिल्ह्यात विनय कोरे यांच्या ‘जनसुराज्य’च्या खांद्यावर बंदूक ठेवून तीन मतदारसंघांमध्ये बंडखोरी करण्यासाठी भाजपने बळ दिल्याची उघड चर्चा आहे. शाहूवाडी मतदारसंघामध्ये जनसुराज्यचे डॉ. विनय कोरे स्वत: निवडून आले. चंदगडमध्ये भाजपकडे उमेदवारी मागणारे शिवाजी पाटील, अशोक चराटी, रमेश रेडेकर रिंगणात राहिले. परिणामी मतविभागणी झाली आणि येथे राष्ट्रवादीचे राजेश पाटील विजयी झाले. राष्ट्रवादीच्या तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदाताई यांना वेळीच भाजपमध्ये घेऊन जोडणी घातली असती तर कदाचित येथे वेगळा निकाल लागला असता.
कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचे आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेक्ष क्षीरसागर यांच्याविरोधात सुरुवातीला कोणी उभारायला तयार नव्हते. मात्र घरात पत्नी भाजपची नगरसेविका आणि भाऊ भाजपचा नगरसेवक असलेल्या उद्योजक चंद्रकांत जाधव पंधरवड्यात कॉँग्रेसची उमेदवारी घेतात काय आणि निवडून येतात काय ? जाधव यांना सार्वत्रिक पाठबळ मिळाल्याचे हे द्योतक आहे.
तर दक्षिणमध्ये भाजपचे अमल महाडिक ज्या मतांच्या फरकाने पराभूत झाले ते पाहता, या ठिकाणी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी चंद्रकांत पाटील यांनी त्यांना दिलेला इशारा फारसा गांभीर्याने घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. थोडक्यात, एकीकडे पाटील कोथरूडमधून लढत असताना त्यांच्याविरोधात सुरुवातीला वातावरण तयार केले गेल्याने त्यांना तेथून हलता येईना. परिणामी कोल्हापूर जिल्ह्यात जिथे-तिथे ज्यांनी-त्यांनी सोयीच्या भूमिका घेतल्या आणि भाजप-शिवसेना युती व्हावी म्हणून आग्रही असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्याच जिल्ह्यात युतीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
भाजपची सत्त्वपरीक्षा
पक्ष वाढविण्यासाठी घेतलेले नेते पक्ष सोडून गेले. दोन आमदारही पराभूत झाले. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही कोल्हापूर जिल्ह्यात युतीची वाईट हालत झाली. शिवसेनेची किमान प्रत्येक तालुक्यात ताकद तरी आहे. नवे घेतलेले बरोबर राहिले नाहीत आणि जुने भाजप कार्यकर्ते नाराज अशा परिस्थितीत आता भाजपला पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागणार आहे आणि अर्थात ही सर्व जबाबदारी पुन्हा चंद्र्रकांत पाटील यांच्यावरच पडणार आहे.