‘भेसळमुक्त मिसळ’वर चर्चा : राजकारण भेसळ करणारे खासदार निवडणुकीत हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 11:13 AM2019-03-07T11:13:04+5:302019-03-07T11:15:17+5:30
व्यापारासह राजकारणात भेसळ करणाऱ्या भेसळखोर खासदारांनाच जनता या निवडणुकीत हद्दपार करेल, अशी टीकाच युवा सेनेच्या वतीने भेसळमुक्त मिसळवर युवकांनी केली.
कोल्हापूर : व्यापारासह राजकारणात भेसळ करणाऱ्या भेसळखोर खासदारांनाच जनता या निवडणुकीत हद्दपार करेल, अशी टीकाच युवा सेनेच्या वतीने भेसळमुक्त मिसळवर युवकांनी केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेसळमुक्तमिसळवर युवकांची चर्चा ही युवा सेनेच्या वतीने हर्षल सुर्वे यांच्या संकल्पनेतून आली. दसरा चौकातील ‘शिव मिसळ’ येथे ही युवकांची चर्चा रंगली असताना अनेक युवकांनी आपली मते मांडली.
‘निवडणुकीपेक्षा विकासाचा दृष्टिकोन’, ‘रोजगारनिर्मिती’, ‘शैक्षणिक सवलती’, तसेच ‘शैक्षणिक विकास’ या विषयांवर चर्चा घडवून आणली. अनेकांनी चर्चेत सहभाग घेताना रोखठोक मते मांडली.
युवा सेनेचे विस्तारक हर्षल सुर्वे म्हणाले, मिसळ-पे-चर्चा करताना ती भेसळ नव्हे, तर निष्ठावंतांची मिसळ आहे; पण हे खासदार व्यापारी बनून कोल्हापुरात आले अन् राज्यकर्ते बनले, ही प्रवृत्ती आज समाजाला दिशादर्शक नव्हे, तर घातक ठरत आहे.
राजकारणही भेसळ करणाऱ्या या व्यापारी प्रवृत्तीच्या खासदारांना जनताच निवडणुकीत हद्दपार करेल, अशीही टीका केली. गेल्या निवडणुकीत त्यांचा प्रचार करताना रॅलीसाठी एका कार्यकर्त्याने त्यांच्या पेट्रोलपंपवर २00 रुपयांचे पेट्रोल घातले; पण त्यानंतर हजार रुपये गाडी दुरुस्तीसाठी खर्च करण्याची पाळी त्याच्यावर आल्याचेही उदाहरण त्यांनी दिले.
संदीप पाटील म्हणाले, रेल्वे, विमानतळ, बास्केट ब्रीज झाले म्हणतात; पण ते दिसत नाहीत. युवकांना नोकऱ्या कोठे निर्माण केल्या, खेळासाठी मैदाने कोठे उपलब्ध केलीत; त्यामुळे या मतदार संघातील युवकच त्यांचा या निवडणुकीत पराभव करतील.
खासदारांची या मातीशी नाळ जुळलेली नाही, त्यांनी आपल्या उद्योगाला बळ मिळावे म्हणून राजकारणाचा आधार घेतला. ते विकास, शेती धोरणावर बोलत नाहीत; त्यामुळे मिसळ पे चर्चा करताना विद्यमान खासदारांनी टीका करण्यापेक्षा विकास कामांवर बोलावे, अशीही मते यावेळी काहींनी मांडली.
चर्चेत युवासेनेचे जिल्हाध्यक्ष मंजीत माने, सागर पाटील, उदय आळवेकर, श्रुतीकिर्ती सावंत, आदींनी सहभाग घेतला, तर राजू यादव, अवधूत साळोखे, आप्पा पुणेकर, शेखर बारटक्के, विनायक जाधव, चैतन्य अष्टेकर, कब्बू करोली, शीतल पाटील, आदी उपस्थित होते.