फुटबॉलपटू संकेत साळोखेच्या खेळीची राज्यभरात चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:25 AM2019-02-17T00:25:55+5:302019-02-17T00:26:37+5:30
बंगलोरकडून निमंत्रण त्याची खेळी पाहून देशातील सुप्रसिद्ध बंगलोर एफ. सी. संघाने त्याला चाचणीसाठी बोलावले आहे. अनिकेत जाधव, निखिल कदम, सुखदेव पाटील या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंनंतर लवकरच संकेत नावारूपास येईल, असा कयास फुटबॉलच्या जाणकारांना आहे.
सचिन भोसले ।
कोल्हापूर : सोलापूर येथे झालेल्या पश्चिम विभागीय संतोष ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र संघाला स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळण्यासाठी पात्रता फेरीतून जावे लागले. यात कोल्हापूरचा एकवीस वर्षीय फुटबॉलपटू संकेत साळोखेने दादरा नगर हवेली संघाविरोधात निर्णायक तब्बल चार गोलची नोंद केली. त्याची ही खेळीच महाराष्ट्र संघाला मुख्य फेरीत पोहोचविण्यासाठी पुरेशी ठरली आणि तो राज्यात चर्चेतील फुटबॉलपटू बनला.
महाराष्ट्र हायस्कूलमधून प्रशिक्षक प्रदीप साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली संकेतने फुटबॉलचे प्राथमिक धडे गिरविले. त्यात राज्यस्तरीय, राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धांतून त्याने राज्याचे प्रतिनिधित्व केले. संकेतला २०१६-१७ या हंगामात वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी पुन्हा मिळाली. त्याची चमकदार खेळी पाहून डॉ. अभिजित वणिरे यांनी त्याला कुडित्रेच्या स. ब. खाडे महाविद्यालयात प्रवेश घेण्यास सुचविले. त्यानंतर सलग दोन वर्षे त्याने आंतरविभागीय फुटबॉल स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. सेंटर हाफ खेळणाऱ्या संकेतने शिवाजी तरुण मंडळाकडून आघाडीचा खेळाडू म्हणून यंदा प्रथमच ‘कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन’कडे नोंदणी केली. त्याचे वडील अनिल साळोखे सराफी दुकानात नोकरीस असून आई स्वाती ही गृहिणी आहे. तो उत्कृष्ट फिनिशर, अॅशेस देणारा, थ्रू बॉल देणारा म्हणून कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात ओळखला जातो. के. एस. ए.ने जिल्हास्तरावर घेतलेल्या चाचणीत उत्कृष्ट खेळीतून प्रभू पोवार, ऋतुराज संकपाळ, हर्षल रेडेकर, सौरभ सालपे, ओंकार जाधव व संकेत अशा सहा जणांची मुंबईतील मुख्य निवड चाचणीसाठी निवड केली. तेथील खेळी पाहून ‘विफा’ने या स्पर्धेसाठी मुख्य संघात निवड केली. त्यात त्याने गुजरातविरोधात अचूक पास दिले, तर दुसºया महत्त्वपूर्ण सामन्यात दादरा नगर हवेली संघाविरोधात तब्बल चार गोलची नोंद केली. हीच खेळी कोल्हापूरसह राज्यातील फुटबॉल क्षेत्रात ‘कोण हो संकेत?’ एवढे म्हणण्यास पुरेशी ठरली.
बंगलोरकडून निमंत्रण
त्याची खेळी पाहून देशातील सुप्रसिद्ध बंगलोर एफ. सी. संघाने त्याला चाचणीसाठी बोलावले आहे. अनिकेत जाधव, निखिल कदम, सुखदेव पाटील या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंनंतर लवकरच संकेत नावारूपास येईल, असा कयास फुटबॉलच्या जाणकारांना आहे.
जगातील सर्वाधिक दुसºया क्रमांकाचे गोल करणारा भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री माझा आदर्श आहे. मला देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. खेळावर निस्सीम प्रेम केल्यावर व कष्ट घेतल्यानंतर कुठलीही गोष्ट अशक्य नाही.
- संकेत साळोखे, राष्ट्रीय फुटबॉलपटू, कोल्हापूर