गोकुळ ठरावाचे पैसे सभासदांना वाटल्याची चर्चा; पन्हाळा तालुक्यातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 11:46 AM2021-05-13T11:46:57+5:302021-05-13T11:50:43+5:30
GokulMilk Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत ठरावधारक मतदारास आपल्याच आघाडीस मतदान करण्यासाठी मिळालेल्या रकमेचे त्या ठरावधारकाने दूध संस्थेच्या सभासदांना प्रत्येकी २५०० प्रमाणे वाटप केल्याच्या बातमीने बुधवारी जिल्ह्यात हवा उडवून दिली. रक्कम जरूर वाटली, परंतु ती दूध फरकाची असून कोरोना मदत म्हणून वाटली असल्याचे त्या ठरावधारकाने स्पष्टीकरण केले. लोकांचा मात्र त्यावर विश्वास बसला नाही. पन्हाळा तालुक्यातील दूध संस्थेमध्ये ही घटना घडली.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत ठरावधारक मतदारास आपल्याच आघाडीस मतदान करण्यासाठी मिळालेल्या रकमेचे त्या ठरावधारकाने दूध संस्थेच्या सभासदांना प्रत्येकी २५०० प्रमाणे वाटप केल्याच्या बातमीने बुधवारी जिल्ह्यात हवा उडवून दिली. रक्कम जरूर वाटली, परंतु ती दूध फरकाची असून कोरोना मदत म्हणून वाटली असल्याचे त्या ठरावधारकाने स्पष्टीकरण केले. लोकांचा मात्र त्यावर विश्वास बसला नाही. पन्हाळा तालुक्यातील दूध संस्थेमध्ये ही घटना घडली.
या संस्थेच्या ७५ सभासदांना त्या ठरावधारकाने प्रत्येकी २५०० रुपयांप्रमाणे ही रक्कम वाटप केल्याचा मेसेज दुपारी सोशल मीडियावर फोटोसह व्हायरल झाला. त्याच गावातील कुण्या तरुणाने तो व्हायरल केला. एकूण रकमेचा विचार केल्यास एक लाख ८७ हजार ५०० रुपये होतात. संघाच्या निवडणुकीत एकेक मतासाठी एवढी रक्कम शेवटच्या टप्प्यात देण्यात आली असल्याने त्याबद्दल जोरदार चर्चा झाली.
कोणत्याही दूध संस्थेचा ठराव एका व्यक्तीच्या नावे असला तरी ती संस्था मोठी करण्यासाठी अनेकांचे हात लागलेले असतात. परंतु अनेक ठिकाणी ज्यांच्या नावावर ठराव, तोच वजीर ठरला व त्यानेच दोन्हीकडून मिळालेले पैसे खिशात घातल्याच्या तक्रारी आहेत.
ही रक्कम समान हप्त्यात सभासदांना वाटप करण्याचा फंडा एका गावात सुरू झाला तर तशी मागणी सगळीकडेच होऊ शकते, असे वाटल्यानेच घडलेला प्रकार दाबला गेल्याची चर्चा सुरू आहे. या पैशातील वाटा सर्वच सभासदांना मिळाल्यास मतदानाचा अधिकार नाही, किमान सत्तेचा तरी लाभ झाला, अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने लोकमतकडे व्यक्त केली.