महापालिकेत घोडेबाजाराची चर्चा

By admin | Published: December 12, 2015 12:58 AM2015-12-12T00:58:39+5:302015-12-12T00:59:56+5:30

नगरसेवकांची पुन्हा एकदा दिवाळी : निवडणुकीतील चुरशीमुळे अनेकांना भाव

Discussion of horses market in the municipal corporation | महापालिकेत घोडेबाजाराची चर्चा

महापालिकेत घोडेबाजाराची चर्चा

Next

कोल्हापूर : महानगरपालिकेतील घोडेबाजार संपविण्याचा विडा उचललेल्या राजकारण्यांनाच आता घोडेबाजाराला प्रोत्साहन देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विधान परिषदेवर पाठवायच्या एक जागेसाठी २७ डिसेंबरला निवडणूक होत असून त्यानिमित्ताने हा घोडेबाजार होऊ घातला असून नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत २५ ते ५० लाख रुपये खर्च करून निवडून आलेल्या नगरसेवकांच्या दृष्टीने ही नामी संधी आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक १ नोव्हेंबरला झाली. निवडून आलेल्या बहुतेक सर्वच नगरसेवकांनी साधारणपणे २५ ते ५० लाख रुपये खर्च करून निवडून आले आहेत. कोणी पक्षाच्या फंडावर निवडणूक लढविली तर कोणी आपल्याजवळील पैसे खर्च कले. काहींनी तर चक्क पाच टक्के व्याजाने खासगी सावकारांकडून कर्जे घेऊन निवडणूक लढविली होती. त्यामुळे निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून काहीजण आर्थिक अडचणीत तर काही नगरसेवक कर्जबाजारी झाले आहेत.
महानगरपालिका निवडणूक पक्षीय पातळीवर झाली असली आणि महापौर, उपमहापौर निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारास मतदान करावे लागले असले तरी असली बंधने आता विधान परिषदेच्या निवडणुकीत नसल्याने तो एक ताण (टेन्शन) कमी झाले आहे. सध्या प्रत्येक जण राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. काय निरोप मिळतो, कोणाची कितीची आॅफर येते याबाबतची उत्कंठा तर सर्वांनाच लागून राहिली आहे.
विधान परिषदेची निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करावे, असा जरी व्हीप निघाला तरी निवडणुकीचे मतदान हे कागदी मतपत्रिकेद्वारे आणि गोपनीय पद्धतीने होणार असल्याने संधी साधण्याचा मोका मिळणार आहे म्हणून नगरसेवक कोणाच्या बाजूने मतदानाला येणार आहे, यापेक्षा तो गुप्त पद्धतीने कोणाला मतदान करणार हे शेवटपर्यंत गोपनीयच राहणार आहे. आपल्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून काही नगरसेवकांनी आतापासूनच मध्यस्थ नेमण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.


२५ लाखांचा दर निघण्याची शक्यता
गतनिवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांना जिल्हा बॅँकेचे संचालक व माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी आव्हान दिले होते. त्यावेळच्या निवडणुकीत कमीत कमी दहा व जास्तीत जास्त पंधरा लाख असा एका मताचा दर निश्चित झाला होता आणि मतदानासाठी आले एका बाजूने आणि मतदान मात्र उलट्या बाजूने करण्यात आल्याचा प्रकारही घडला होता.
यंदा तर आमदार महाडिक यांची लढत माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत होत असून, ही लढत अत्यंत काटाजोड आणि भल्या-भल्यांचे राजकीय अंदाज चुकविणारी आहे. कोण निवडून येणार हे सांगणे तसे महाकठीण आहे. त्यामुळे यंदा हाच दर एका मतासाठी कमीत कमी २५ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यात तो आणखी फुगण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या शिवाय आठ ते दहा दिवसांची सहलही होणार असल्याने नगरसेवक सध्या खूश आहेत. फक्त प्रतीक्षा आहे, ती कोण किती देणार याची !


महापौर, उपमहापौर निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारास मतदान करावे लागले तसे बंधने आता विधान परिषदेच्या निवडणुकीत नसल्याने तो एक ताण (टेन्शन) कमी झाला आहे. त्यामुळे आता कोण ‘जास्त’ देणार त्याला मतदान अशी भूमिका काहींची दिसते.

Web Title: Discussion of horses market in the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.