चर्चेतील मुलाखत ग्रामपंचायतींनी आरोग्य, शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:24+5:302021-06-06T04:18:24+5:30

प्रश्न/सध्या कोरोनाच्या काळात आता तुम्ही कशाला प्राधान्य देत आहात? उत्तर : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा परिषद, ...

Discussion Interview Gram Panchayats need to give priority to health and education | चर्चेतील मुलाखत ग्रामपंचायतींनी आरोग्य, शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज

चर्चेतील मुलाखत ग्रामपंचायतींनी आरोग्य, शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज

Next

प्रश्न/सध्या कोरोनाच्या काळात आता तुम्ही कशाला प्राधान्य देत आहात?

उत्तर : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींचे सर्वतोपरी प्रयत्न सुरूच आहेत. हे एकीकडे काम सुरू असताना दुसरीकडे लसीकरणाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना एका दिवसात संपणार नाही हे वास्तव आहे. त्यामुळे लसीकरणाच्या माध्यमातून ग्रामस्थांची प्रतिकारशक्ती वाढवणे आपल्या हातात आहे. त्याला प्राधान्य देत आहे. यासाठी आता आशा आणि अंगणवाडी ताईंच्या माध्यमातून महाआयुष अ‍ॅपद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. निवडणूक मतदारयादीच घेऊन हे सर्व जण घरोघरी जात असल्याने ६० वर्षांवरील एकही नागरिक सर्वेक्षणातून सुटणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांचे कोणत्याही परिस्थितीत लसीकरण करून घेतले जाणार आहे.

प्रश्न/ ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अजूनही आटोक्यात येत नाही, त्याचे काय?

उत्तर : ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच आम्ही करवीर, हातकणंगले, शिरोळसह बाराही तालुक्यांतील रुग्णसंख्या अधिक असलेल्या गावांवर लक्ष केंद्रित केले आहे. सर्वेक्षणात लक्षणे दिसली की तातडीने अ‍ॅंटिजन चाचणी केली जाते. केवळ तीन तालु्क्यांसाठी ६ हजार किट देण्यात आले आहेत. अधिकच लक्षणे असतील तर आरटीपीसीआर चाचणी आणि तोपर्यंत संस्थात्मक अलगीकरणामध्ये वास्तव्य अशी कार्यपद्धती सुरू केली आहे.

प्रश्न/गेल्या वर्षीसारख्या या वेळी ग्रामसमित्या सक्रिय नाहीत, असे का?

उत्तर : स्थानिक पातळीवर अनेक अडचणी होत्या. त्यामुळे यंदा या समित्या कार्यरत करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले; परंतु जिल्हाधिकारी आणि मी सातत्याने त्यांचा पाठपुरावा करत आहोत. परिणामी आता ग्रामसमित्या सक्रिय झाल्या आहेत. गावागावांत कट्ट्यावर गप्पा मारत बसणाऱ्यांचीही अ‍ॅंटिजन चाचणी सुरू केली आहे. ग्रामसमित्या सक्रिय झाल्या तरच आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी येणार आहे. हे या सर्वांना समजावून सांगितले आहे आणि या सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रश्न/ गावात खर्चासाठी निधीची तरतूद कशी करायची?

उत्तर : अनेक ठिकाणी आम्हाला हा प्रश्न भेडसावत होता. राज्यातच ही परिस्थिती असल्याने पंधराव्या वित्त आयोगातून २५ टक्के निधी कोरोनावर खर्च करण्यासाठी परवानगी दिली आहे. मी पंधरा दिवसांपूर्वीच ग्रामपंचायतीला डॉक्टर, नर्स, कंपाऊंडर, स्वच्छता कर्मचारी नेमण्यासाठी, औषध खरेदीसाठी आवश्यक साहित्यासाठी खर्च करण्याची परवानगी दिली आहे.

प्रश्न जि. प., पं. स. सदस्यांची भूमिका काय आहे?

उत्तर : या कामात जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्यच महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कारण ही सर्व मंडळी स्थानिक नेते आहेत. हजारो ग्रामस्थांचे ही मंडळी नेतृत्व करतात. त्यामुळे त्यांच्या हाकेसरशी अनेक कार्यकर्ते कोरोनाविरोधातील लढाईमध्ये उतरल्याचे चित्र मी कोल्हापूर जिल्ह्यात पहात आहे. त्यामुळेच गेली अनेक वर्षे रस्ते, गटारे आणि पेव्हिंग ब्लॉक्स घालण्याची काम करत आला आहात. आता संपूर्ण ताकद कोरोनाविरोधातील लढाईमध्ये लावूया, असे आवाहन मी जि. प. पदाधिकारी, सदस्यांना केले आहे. पंधराव्या वित्त आयोगातील याबाबतचे बदल प्रस्ताव मी तातडीने मंजूर करण्याची भूमिका घेतली आहे.

प्रश्न/ बदलत्या परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतींची भूमिका कशी असावी?

उत्तर : आता केवळ कर गोळा करणे आणि रस्ते, पाणी, दिवाबत्ती एवढ्यापुरते ग्रामपंचायतींचे काम मर्यादित राहिलेले नाही. गेली अनेक वर्षे आपण रस्ते, पाणी योजना, गटर्स करत आलो आहोत. सांस्कृतिक सभागृहे उभारत आलो आहोत. आता याच्यापुढे जात आरोग्य आणि शिक्षणाला अधिक प्राधान्य देण्याची गरज आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ग्रामपंचायती आता ऑनलाइन झाल्या आहेत. ग्रामपंचायतींनी आता आपले गाव आरोग्यपूर्ण कसे राहील, दर्जेदार शिक्षणात अव्वल कसे राहील याकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी पावले टाकली आहेत, याचा मला आनंद आहे.

०५०६२०२१ कोल संजयसिंह चव्हाण

Web Title: Discussion Interview Gram Panchayats need to give priority to health and education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.