चर्चेतील मुलाखत.. पोपटराव पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:24 AM2021-01-03T04:24:37+5:302021-01-03T04:24:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जवळपास निम्म्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्याने राजकीय ...

Discussion Interview .. Popatrao Pawar | चर्चेतील मुलाखत.. पोपटराव पवार

चर्चेतील मुलाखत.. पोपटराव पवार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जवळपास निम्म्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना इच्छुकांमधील इर्षा पाहिली तर गावागावात टोकाचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. राजकीय इर्षेेत गावगाड्यांचा विकास खुंटतो, याकडे कोणाचेही लक्ष नसते. यासाठी गावचे नेतृत्व करणाऱ्यांबरोबरच निवडणुकीत जनतेने नेमकी काय भूमिका घ्यावी, याबाबत ‘हिवरे बाजार’ पॅटर्न संपूर्ण देशात गाजवला, ते पद्मश्री पोपटराव पवार यांच्याशी साधलेला संवाद...

निवडणुकीतील दारू, पैशाच्या वापराने गावे मोडणार - पोपटराव पवार

पायाभूत सुविधांबरोबरच मनाचा विकास केला पाहिजे : निर्व्यसनी, प्रामाणिक उमेदवारांना पाठबळ द्या

प्रश्न : गावाचा विकास म्हणजे नेमके काय?

उत्तर : रस्ते, गटारे, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजांची पूर्तता करायलाच हवी. त्याचबरोबर आधुनिक शेती करत त्याला दुग्ध व्यवसायाची जोड दिल्यास कुटुंबे समृध्द होतील. पण हा गावाचा सर्वांगिण विकास नव्हे, तर गावातील माणूस बदलला पाहिजे. जसा पैसा हातात येईल, तशा गरजा वाढतील आणि पैशाचा हव्यासही वाढत जाईल. त्यातूनच ताण, नैराश्य येते. त्यामुळे अशी गावे आपल्याला निर्माण करायची नाहीत, तर आनंददायी गावे होण्यासाठी पहिल्यांदा मनाचा विकास महत्वाचा आहे.

प्रश्न : शासनाकडून ग्रामपंचायतींना कोट्यवधींचा निधी मिळतो, मग समस्या कायम कशा?

उत्तर : कोणत्याही गावाचा एक -दोन वर्षात विकास होत नाही, त्यासाठी नियोजन हवे, त्यानुसार काम केले पाहिजे. निव्वळ पैशांनी गावे बदलली असती, तर आज महाराष्ट्रातील हजारो गावे मॉडेल बनली असती. विकासकामांची गुणवत्ता महत्वाची आहे, त्याचबरोबर त्यांची देखभाल, दुरूस्ती सातत्याने झाली पाहिजे. लोकशाही आहे, यामध्ये कायमस्वरूपी कोणीही सत्तेवर राहात नाही. एखाद्या गटाने चांगले काम करूनही त्यांचा पराभव झाला तर नवीन येणाऱ्या लोकांनी ती चांगले कामे पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विरोधाला विरोध म्हणून पाहता कामा नये.

प्रश्न : ग्रामपंचायतीसाठी इच्छुक असणाऱ्यांना आपण काय सांगाल?

उत्तर : ग्रामपंचायतीची निवडणूक ही लोकशाहीतील सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे. कारण गावे स्वयंपूर्ण झाली तरच देश समृद्ध होणार आहे. प्रतिष्ठेसाठी अनेकजण निवडणूक लढवताना आपण पाहतो, अशा मंडळींकडून गावाच्या विकासाची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे गावाच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय बाळगून ग्रामपंचायतीमध्ये जावे.

प्रश्न : मतदारांनी कोणत्या उमेदवाराला संधी द्यावी?

उत्तर : निर्व्यसनी, प्रामाणिक व गावासाठी वेळ देणाऱ्या नेतृत्वाला मतदारांनी पाठबळ द्यावे. अलिकडे निवडणुकीत तरूणाईचा सहभाग वाढला आहे, ही एका अर्थाने चांगली गोष्ट असली तरी निवडणुकीत दारू, पैशांचा वाढलेला वापर चिंताजनक आहे. दारू, पैसे वाटून आपण गावे उभी न करता ती मोडता आहात. निवडणुकीतून तरूणाई व्यसनाधीन होणार असेल तर गावाचे भविष्य काय? जनतेने समग्र परिवर्तनासाठी कर्तबगार उमेदवाराच्या मागे उभे राहावे.

अनुदानामुळे समाज पंगू

स्थानिक परिस्थिती आणि तेथील गरजा पाहून विकास आराखडा तयार करून त्याला शासकीय योजनांची जोड दिली तर गावे समृध्द होण्यास वेळ लागत नाही. सगळाच विकास शासकीय निधीतून करता येत नाही, अनुदानामुळे समाज पंगू झाला आहे. खरा विकास हा लोकसहभागातूनच होतो. मग ते श्रमदान असेल किंवा लोकवर्गणी असेल, असे पोपटराव पवार यांनी सांगितले.

Web Title: Discussion Interview .. Popatrao Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.