संभाव्य सरकारमध्ये विनय कोरे, आबीटकर, आवाडेंच्या मंत्रीपदाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 01:05 PM2022-06-23T13:05:37+5:302022-06-23T16:41:12+5:30
अचानक घडलेल्या नाट्याने निष्ठावंत पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये गेली दोन दिवस कमालीची घालमेल
राजाराम लोंढे
कोल्हापूर : जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर व सहयोगी सदस्य, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे दोघेही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने येथे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अचानक घडलेल्या नाट्याने निष्ठावंत पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये गेली दोन दिवस कमालीची घालमेल सुरू झाली आहे. राज्यातील एकूणच राजकीय परिस्थिती पाहता भाजप व शिंदे गट मिळून सरकार स्थापन होण्याची दाट शक्यता असून त्यामध्ये जिल्ह्यातील तिघांना संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे.
कोल्हापूर जिल्हा काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मात्र सन २०१४ पासून येथे शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही खासदार निवडून आणून जिल्हा भगवामय केला होता. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोडी व तडजोडीच्या राजकारणाने पक्षाला सपाटून हार पत्करावी लागली. प्रकाश आबीटकर यांच्या रुपाने एकमेव आमदार निवडून आले. शिरोळमधून राजेंद्र पाटील-यड्रावकर हे अपक्ष निवडून आले. त्यांनी शिवबंधन बांधल्यानंतर राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली. मात्र मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत आबीटकर व पाटील-यड्रावकर हे गेल्याने शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांची गेली दोन दिवस घालमेल सुरू आहे.
राजकीय उलथापालथीनंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्याची आशा बळावली आहे. सध्या राज्यात सत्तांतर झालेच तर कोणाला मंत्रीपदाची संधी मिळू शकते, याविषयी चर्चेला ऊत आला आहे. या सरकारमध्ये कोल्हापूरला चांगली संधी मिळू शकते. बंडात शिंदे यांच्यासोबत राहिलेले प्रकाश आबीटकर यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळू शकते. भाजपकडून चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच आमदार विनय कोरे किंवा प्रकाश आवाडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते.
कोणता झेंडा घेऊ हाती.....
शिवसेनेत बंडाळी माजल्याने आता माजी आमदारांसह पक्ष नेते, उपनेत्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणता झेंडा घेऊ हाती, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.
निष्ठावंतांना अश्रू अनावर..
जिल्ह्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनचे शिवसैनिक कार्यरत आहेत. पक्षात पडलेल्या उभ्या फुटीने कट्टर शिवसैनिक अस्वस्थ झाले आहेत. अनेकांना अश्रू अनावर झालेत.
दोन्ही खासदार मुंबईत
मोठ्या प्रमाणात आमदार बाजूला गेल्याने शिवसेना नेतृत्वाने सावध हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील दोन्ही खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने हे बुधवारी मुंबईतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान ‘वर्षा’वर होते.