Kolhapur: जीवनात अयशस्वी झाल्याने निराश, कोपार्डे येथे उच्चशिक्षित तरुणाने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 03:43 PM2023-09-11T15:43:53+5:302023-09-11T16:48:36+5:30
प्रकाश पाटील कोपार्डे : जीवनात अयशस्वी झाल्याने नैराश्येतून कोपार्डे (ता. करवीर) येथे उच्चशिक्षित तरुणाने आत्महत्या केली. मंथन शरद बेंडकळे (वय ...
प्रकाश पाटील
कोपार्डे : जीवनात अयशस्वी झाल्याने नैराश्येतून कोपार्डे (ता. करवीर) येथे उच्चशिक्षित तरुणाने आत्महत्या केली. मंथन शरद बेंडकळे (वय २२) असे या मृत युवकाचे नाव आहे. आत्महत्येचा प्रकार काल, रविवारी रात्री उशिरा उघडकीस आला. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे. मंथनने चार पानी सुसाईड नोट लिहली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंथन हा बी.टेक झाला होता. त्याला कंपनीचा नोकरीसाठी कॉल आल्याने रविवारी आँनलाईन परिक्षेमुळे तो घरी एकटाच होता. भाऊ सागर दुपारी मंडळाच्या मंडप उभारणीसाठी मित्रांनी बोलवल्याने कुंभी कारखान्यावर गेला. तर आईवडील ढेबेवाडी येथे गावी गेले होते.
मंथनचे आईवडील व नातेवाईक त्याला दुपारी चार वाजल्यापासून फोन करत होते पण तो उचलत नव्हता.
परिक्षेत व्यस्त असेल म्हणून नातेवाईकांनी दुर्लक्ष केले. भाऊ सागर रात्री दहाच्या दरम्यान घरी आला असता त्याने घरात मंथनची शोधाशोध केली. यावेळी वरच्या मजल्यावर मंथनने लोखंडी हुकाला दोरीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. त्याने नातेवाईक व मित्रांना याची कल्पना दिली. करवीर पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात पाठवला. त्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ आहे.
जीवनात अनसक्सेस झाल्याने निराश
आत्महत्येपूर्वी मंथनने लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नका. मला आई-वडिलांनी भरपूर प्रेम दिले आहे. गैरसमज नको मी जीवनात अनसक्सेस झाल्याने निराश होऊन आत्महत्या केली आहे. यापूर्वी मी दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असेही चिठ्ठीत लिहले आहे.