इचलकरंजी नगरपालिकेत निर्जंतुकीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:18+5:302021-07-21T04:17:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिकेतील कार्यालयात निर्जंतुकीकरणासाठी सर्वत्र सॅनिटायझेशन करण्यात आले. शहर व परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिकेतील कार्यालयात निर्जंतुकीकरणासाठी सर्वत्र सॅनिटायझेशन करण्यात आले. शहर व परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या अद्यापही गंभीर स्थितीत आहे. शहरातील वाढत जाणाऱ्या कोरोनाने पालिकेतही शिरकाव केला आहे. पालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रत्येक जण खबरदारी घेत काम करण्याची आवश्यकता आहे.
पालिका प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे; परंतु अद्यापही शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. कोरोनाने दगवणाऱ्यांची संख्या कमी असली तरी दररोज जवळपास ४० ते ४५ नागरिक पॉझिटिव्ह आढळत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. सध्या पालिकेतील अनेक कर्मचारी कोरोनासंबंधित व चतुर्थ श्रेणी कर आकारणीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांचा दिवसभर अनेक नागरिकांशी संपर्क येत असतो. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पालिका प्रशासनाने नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सत्ताधारी व विरोधी पक्ष कार्यालय, तसेच अनेक महत्त्वाच्या विभागात निर्जंतुकीकरण केले. शहरात प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होत असते. याठिकाणीही औषध फवारणी सुरू आहे.
अधिकारीच पॉझिटिव्ह
नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल व आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार हे काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. कोरोनाकाळात सातत्याने शहरातील परिस्थितीचा कामकाज आढावा घेण्याचे काम सुरू असते. मात्र, मुख्याधिकारी व आरोग्य अधिकारी पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनावर ताण निर्माण होत आहे.
फोटो ओळी
२००७२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजी नगरपालिकेतील कार्यालय परिसरात निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझेशन करण्यात आले.