आडात टाकले कीटकनाशक
By admin | Published: April 29, 2015 11:29 PM2015-04-29T23:29:04+5:302015-04-30T00:25:31+5:30
हिंगणगादेत प्रकार : ग्रामसेवक, शिपायाचे कृत्य; ग्रामस्थ आक्रमक
विटा : खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सार्वजनिक आडात टीसीएलऐवजी बीएचसी कीटकनाशक पावडर टाकल्याने प्रचंड खळबळ उडाली. ग्रामसेवक एस. आर. तांबोळी यांच्या सांगण्यावरून शिपाई चंद्रकांत खवळे याने हे कृत्य केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. हा प्रकार लक्षात आला नसता, तर ग्रामस्थांसह जनावरांच्या जीवितासही धोका निर्माण झाला असता. संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवकास धारेवर धरले. दरम्यान, या प्रकारानंतर आडातील पाणी उपशाचे काम बुधवारी दिवसभर सुरू होते.
हिंगणगादेच्या दक्षिणेस बंधाऱ्याजवळ पाणीपुरवठा करणारा सार्वजनिक आड आहे. या आडातून सुमारे दोन ते अडीच हजार लोकांना पाणीपुरवठा होतो. मंगळवारी दुपारी ग्रामसेवक तांबोळी व सरपंच पती नारायण कुंभार यांनी शिपाई चंद्रकांत खवळे याला आडाच्या पाण्यात टीसीएल पावडर टाकण्यास सांगितले. ग्रामपंचायत कार्यालयात गटारीवर टाकण्यासाठी बीएचसी कीटकनाशक पावडर व टीसीएल पावडर ठेवण्यात आली होती. मात्र, शिपाई नवीन असल्याने त्याला या दोन्ही पावडरमधील फरक लक्षात आला नाही. त्याने बीएचसी कीटकनाशकाचे २५ किलो पावडरचे पोते उचलून आडात टाकले. त्यामुळे पाण्यावर पावडरचा थर साचला. या प्रकाराने ग्रामस्थ संतप्त झाले.
अखेर आडातील पाणी पूर्णपणे उपसून आड स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी सकाळी नऊपासून पंपाव्दारे आडातील पाणी काढण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)
शिपायावर कारवाई होणार
हिंगणगादेचा शिपाई नवीन आहे. त्याला टीसीएल पावडर टाकण्यास सांगितले होते. परंतु, नजरचुकीने बीएचसी कीटकनाशक पावडर आडाच्या पाण्यात पडली. एक वाटी (२०० ग्रॅम) पावडर पाण्यात पडली होती. आडातील पाणी उपसा करण्याचे काम सुरू असून, यापुढे असा प्रकार घडू नये, याची दक्षता घेत आहोत. संबंधित शिपायावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक एस. आर. तांबोळी यांनी सांगितले.