रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या हॉस्पिटलचे परवाने रद्द करा : शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:12 PM2018-10-17T12:12:13+5:302018-10-17T12:18:05+5:30
सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पैसे मिळूनही रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या जिल्ह्यातील १० बड्या हॉस्पिटलना वगळण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे केली
कोल्हापूर : सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पैसे मिळूनही रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या जिल्ह्यातील १० बड्या हॉस्पिटलना वगळण्याची कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई एवढ्यावरच मर्यादित न ठेवता त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यामध्ये हयगय केल्यास उग्र अांदोलन करून जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना खुर्चीवर बसू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, या हॉस्पिटलचे परवाने रद्द करण्याची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी करावी. तसेच या संदर्भातील अहवाल एक महिन्यात द्यावा, अन्यथा जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना खुर्चीवर बसू देणार नाही.
यावर जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी सरकारची समिती असून, आरोग्य विभागाकडून याची कारवाई केली जाते. आपली जबाबदारी समन्वयकाची असून याबाबतची वस्तुस्थिती संबंधित यंत्रणेला कळविली जाईल, असे सांगितले.
जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी औषधेही हॉस्पिटलच्या मेडिकल दुकानातून घेण्याची सक्ती केली जाते. ती करू नये असे सांगितले. तसेच सर्व हॉस्पिटलना आयसीयू, खासगी व सर्वसाधारण रूमचे दरफलक लावण्याची सक्ती करावी, असे सांगितले.
जिल्हाधिकारी यांनी आपल्याच दुकानातूनच औषधे घेण्याबाबतची सक्ती हॉस्पिटलनी करू नये, या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले. शिष्टमंडळात दुर्गेश लिंग्रस, रवी चौगुले, अवधूत साळोखे, राजू यादव, शशी बिडकर, दत्ताजी टिपुगडे, आदींचा समावेश होता.