सभासदत्व रद्दवरून कोल्हापूरात कृषी कर्मचारी पतसंस्थेच्या सभेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 05:30 PM2017-09-03T17:30:06+5:302017-09-03T17:36:21+5:30
कृषी कर्मचारी पतसंस्थेविरोधात तक्रारी करून बदनामी केल्याने कोल्हापूर जिल्हा कृषी कर्मचारी पतसंस्थेच्या सभेत प्रकाश रावण यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव अवाजवी मतांने मंजूर करण्यात आला. या मुद्यांवरून सत्तारूढांसह विरोधक आक्रमक झाल्याने सभेत गोंधळ उडाला.
कोल्हापूर : संस्थेविरोधात तक्रारी करून बदनामी केल्याने कोल्हापूर जिल्हा कृषी कर्मचारी पतसंस्थेच्या सभेत प्रकाश रावण यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव अवाजवी मतांने मंजूर करण्यात आला. या मुद्यांवरून सत्तारूढांसह विरोधक आक्रमक झाल्याने सभेत गोंधळ उडाला. एकमेकाच्या अंगावर धावून गेल्याने वातावरण तणावपुर्ण बनले.
कृषी कर्मचारी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी शाहू स्मारक भवन येथे झाले. अध्यक्षस्थानी अध्यक्ष शशिकांत चपाले होते. रावण यांनी गेले वर्षभर पतसंस्थेच्या कारभाराविरोधात सहकार विभागाकडे तक्रारी केल्याने संस्थेची कलम ८३ नुसार चौकशी करण्यात आली. संस्थेची बदनामी केली म्हणून सत्तारूढ गटाने त्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा विषय विषय पत्रिकेवर ठेवला होता.
अध्यक्ष चपाले यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. गत वर्षीपेक्षा २० लाख ठेवीत वाढत करत असताना तेवढेच कर्जात वाढ केली आहे. काटकसरीचा कारभार केल्याने २७ लाख ५० हजाराचा निव्वळ नफा झाला. केवळ व्यवसाय न करता सामाजिक बांधीलकीतून विविध उपक्रम राबविले जातात. सातत्याने ‘अ’ वर्ग लेखापरिक्षण राखत सभासदांना ९.७५ टक्के लाभांश दिल्याचे अध्यक्ष चपाले यांनी सांगितले.
सचिव नामदेव चव्हाण यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. पत्रिकेवरील क्रमांक ९ चा रावण यांचे सभासदत्व रद्दचा विषय सचिव चव्हाण यांनी वाचला आणि गोंधळास सुरूवात झाली. सर्जेराव सोनवणे व संतोष पाटील यांनी या विषयास विरोध केला. संस्थेच्या कामकाजाची माहिती मागवणे, चुकीवर बोट ठेवणे गुन्हा आहे का? असा सवाल सोनवणे यांनी केला. यावर सेवानिवृत्त झालाय तुम्हास बोलण्याचा अधिकार नसल्याचे धनाजी बरकाळे यांनी सांगितले. यावर रावण यांचे सभासदत्व रद्दचा ठरावावर मंजूर, नामंजूर अशा घोषणा देण्यात आल्या.
चार वर्षे सभासद झालेल्यांना संस्थेचा इतिहास माहित नसल्याचे सांगत या मार्गाने संघटना आत घुसत असल्याचा आरोप तात्या परीट यांनी केला. त्यावर आक्षेप घेत,सभासद चार वर्षाचा असू दे अथवा चाळीस, प्रश्न विचारण्याचा अधिकार सर्वांना असल्याचे सांगत महादेव जाधव यांच्यासह काही सभासदांनी थेट व्यासपीठावर जात अध्यक्ष चपाले यांना जाब विचारण्यास सुरूवात केल्याने सत्तारूढ गटाचे सभासदही आक्रमक झाले.
अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडल्याने गोंधळ वाढला. अतुल जाधव व कमल बाणदार यांच्यात चांगलीच जुंपली. अध्यक्ष चपाले यांनी सर्वाना शांत करत रावण यांचे सभासदत्व रद्द का केले? हे सांगितले. यावर हात वर करून रद्दच्या बाजूने व विरोधात मतदान घेतले. अवाजवी मतांनी ठराव मंजूर करण्यात आला. उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी आभार मानले.
सत्कारावेळीच गोंधळास सुरूवात!
सभेत सेवानिवृत्त सभासद व गुणवंत पाल्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता. थकबाकी असल्याने दिलीप जमने (शाहूवाडी) यांचा सत्कार करण्यास सचिव नामदेव चव्हाण यांनी नकार दिल्याने गोंधळ उडाला. काही सभासदांनी आक्रमक भूमिका घेत चव्हाण यांनी माफी मागावी, असे लावून धरले.
कर्जमर्यादा सात लाखाची
सभासदांना सध्या चार लाख कर्ज दिले जाते. त्यामध्ये वाढ करून सात लाख देण्याबाबतची उपविधी दुरूस्तीसाठी ठेवली होती. यामध्ये शिल्लक सेवेप्रमाणे हप्ते पाडून वाढीव कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सांगा मी बदनामी कशी केली
सहकार विभागाकडे केलेल्या नऊ तक्रारी, त्यावर झालेली चौकशी व चौकशी अधिकाºयांचा अभिप्राय याची माहिती प्रकाश रावण यांनी सभेपुढे ठेवली. सांगा मी संस्थेची बदनामी कशी केली? असा सवाल त्यांनी सभेला केला.