गृह विलगीकरणाचे उल्लंघन झाल्यास थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:24 AM2021-05-13T04:24:27+5:302021-05-13T04:24:27+5:30
कोल्हापूर : कोविड पॉझिटिव्ह व संशयितांनी जर गृह विलगीकरणाचे नियम तोडले तर त्यांच्या रवानगी सक्तीने कोविड केअर सेंटरमध्ये केली ...
कोल्हापूर : कोविड पॉझिटिव्ह व संशयितांनी जर गृह विलगीकरणाचे नियम तोडले तर त्यांच्या रवानगी सक्तीने कोविड केअर सेंटरमध्ये केली जाईल, असा इशारा महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केला. यासंदर्भात कोणी नियमांचे उल्लंघन करत असल्यास नागरिकांनी महापालिकेला माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कोल्हापूर शहरात १००९ कोविड पॉझिटिव्ह रुग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. तर काही संशयित रुग्णांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे गृह विलगीकरणातील कोणी रुग्ण व संशयित सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचे आढळून आल्यास त्यांना सक्तीने उचलून कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाईल, तशा सक्त सूचना प्रभाग सचिवांना देण्यात आल्या आहेत, असे बलकवडे यांनी सांगितले.
कोल्हापूर शहरातील लसीकरणाला लसीच्या तुटवड्यांचा अडथळा येत असून जशी लस येईल तसे लसीकरण केले जात आहे. कोल्हापूर शहरात १६ हजार ८८८ नागरिक कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र बुधवारी चार हजार डोस आले आहेत. त्यामुळे ज्यांना दुसऱ्या डोसची तारीख जवळ आली आहे, त्यांना फाेन करुन केंद्रावर बोलावून घेतले जाणार असल्याचे बलकवडे यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे उपस्थित होते.
-महापालिका हद्दीतील कोरोना स्थिती -
- शहरातील उपचार घेत असलेले रुग्ण - १७१९
- घरीच थांबून उपचार घेणारे रुग्ण - ९७५
- रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट - १०.७५
- शहरातील कंटेनमेंट झोन - २०२
- कंटेनमेंट झोनमधील व्याधीग्रस्त - ३५०७
- त्यापैकी स्वॅब घेतलेल्या व्यक्ती - २१३१
- त्यातील पॉझिटिव्ह व्यक्ती - १०४
- कंटेनमेंट झोनमधील सर्दी,खोकला रुग्ण - ५४८
- यापैकी पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण - ५९
-आतापर्यंत ॲंटिजन चाचण्या - ३९६६
- ॲंटिजन चाचण्यातून पॉझिटिव्ह रुग्ण - १८८