विस्थापित शिक्षकांची प्राधान्याने सोयीची बदली करणार : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 03:09 PM2020-01-20T15:09:06+5:302020-01-20T15:12:34+5:30
राज्यात गेल्या दोन वर्षांत बदली प्रक्रियेत जे प्राथमिक शिक्षक विस्थापित झाले. त्यांची प्राधान्याने सोयीची बदली करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिली. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ज्ञानाने अद्ययावत व्हा. अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न उद्भवणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी शिक्षकांना केले.
कोल्हापूर : राज्यात गेल्या दोन वर्षांत बदली प्रक्रियेत जे प्राथमिक शिक्षक विस्थापित झाले. त्यांची प्राधान्याने सोयीची बदली करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिली. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ज्ञानाने अद्ययावत व्हा. अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न उद्भवणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी शिक्षकांना केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे येथील गणेश लॉनमधील राज्यस्तरीय महामंडळ सभेत ते बोलत होते. शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी प्रास्ताविकातून विविध मागण्या मांडल्या. त्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारच्या दुर्लक्षामुळे तुमचे छोटे असणारे प्रश्न आता गंभीर बनले आहेत. आपल्या सर्वांचे नेते शरद पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार बदलीबाबतच्या धोरणात तातडीने सुधारणा करणार आहे. त्यात २७ फेब्रुवारी २०१७ च्या राज्यस्तरीय आॅनलाईन खो-खो बदली प्रक्रिया धोरणात दुरूस्ती करण्यात येईल.
सन २०१८ आणि २०१९ या वर्षांतील बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या शिक्षकांची प्राधान्याने सोयीची बदली केली जाईल. त्याबाबतचे सुधारित परिपत्रक ग्रामविकास विभागाला नवीन सचिव मिळाल्यानंतर लगेच काढण्यात येईल.
या सभेच्या प्रारंभी शिक्षक नेते शिवाजीराव पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विविध १६ मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संभाजीराव थोरात यांनी दिले. प्रवीण यादव, रविकांत आडसूळ, संजय जगताप, प्रवीण कांबळे, आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील, सरचिटणीस सुनील पाटील, प्रकाश येडगे, लक्ष्मी पाटील, जयवंत पाटील,आदींसह राज्यभरातील शिक्षक उपस्थित होते. स्वाती शिंदे, महेश घोटणे, किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मेघनाथ गोसावी यांनी स्वच्छतेचा पोवाडा सादर केला.
काही मागण्या अशा
- १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
- नगरपालिका, महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी शासनाने शंभर टक्के अनुदान द्यावे.
- २७ फेब्रुवारी २०१७ च्या बदली धोरणात आवश्यक ते बदल करून सर्वसमावेशक नवीन बदली धोरण तयार करावे.
- शिक्षकांना बीएलओंसह इतर अशैक्षणिक कामातून मुक्त करावे.
- संगणक प्रशिक्षणास मुदतवाढ देऊन झालेली वसुली परत द्यावी.