सबजेलचे स्थलांतर रखडले महापालिकेचा दीड वर्ष खोडा : निवासस्थाने बांधण्याबाबतही निर्णय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 01:15 AM2018-04-29T01:15:57+5:302018-04-29T01:15:57+5:30
कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व काळात शहराच्या मध्यवस्तीत सुरू झालेल्या बिंदू चौक सबजेलचे कळंबा मध्यवर्ती कारागृहात विलीनीकरण करण्याचे काम महापालिका प्रशासनामुळे रखडले आहे.
एकनाथ पाटील ।
कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व काळात शहराच्या मध्यवस्तीत सुरू झालेल्या बिंदू चौक सबजेलचे कळंबा मध्यवर्ती कारागृहात विलीनीकरण करण्याचे काम महापालिका प्रशासनामुळे रखडले आहे. कळंबा कारागृह प्रशासनाने उपकारागृहाच्या जागेबदली पद्माळा परिसरातील ५५ एकर जागेत शासकीय निवासस्थाने बांधून देण्याची मागणी केली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने याबाबत कोणताच निर्णय घेतला नसल्याने उपकारागृहाच्या स्थलांतराचा प्रश्न गेल्या दीड वर्षापासून रेंगाळला आहे.
शहराच्या मध्यवस्तीत बिंदू चौकात १८४७ मध्ये कैद्यांना ठेवण्यासाठी उपकारागृहाची (सबजेल) स्थापना करण्यात आली. सुमारे पावणेदोन एकरांत हे कारागृह वसले आहे. कारागृहाच्या सभोवती नागरी वस्ती, बिंदू चौक परिसर, अंबाबाई मंदिर असा संवेदनशील परिसर आहे. या कारागृहात १०४ कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे. गुन्ह्यातील खटल्यांमध्ये कच्चे व शिक्षा झालेले कैदी या ठिकाणी बंदिस्त ठेवले जातात. कारागृह नागरी वस्तीमध्ये असल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना कारागृहाच्या उंचीपेक्षा जास्त मजली इमारती बांधण्यास परवानगी नाकारली आहे. कारागृहाच्या जागेवर पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समिती व महापालिका प्रशासनाचा मालकी हक्क आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कारागृहाला लागून वाहनतळ सुरू करण्यात आला आहे.
या ठिकाणी नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते. वाहनतळासाठी अन्यत्र जागा महापालिकेकडे उपलब्ध असली तरी ती मंदिरापासून लांब आहे. कळंबा मध्यवर्ती कारागृह प्रशस्त आहे. सबजेल त्या ठिकाणी हलविल्यास ही जागा पार्किंगसाठी वापरता येईल, हा उद्देश समोर ठेवून तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, तत्कालीन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, सध्याचे कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी बिंदू चौक सबजेल मध्यवर्ती कारागृहात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यासंबंधी जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी अंदाजपत्रक तयार केले आहे.
दरम्यान, बिंदू चौक कारागृहाच्या जागेबदली कळंबा स्मशानभूमीकडे जाणाºया परिसरातील सतरा एकर जागा कळंबा मध्यवर्ती कारागृहाला देण्याचे महापालिका प्रशासनाने मान्य केले आहे. मात्र, कारागृह प्रशासनाने या १७ एकर जागेअभावी पद्माळा येथे आपली ५५ एकर जागा आहे. या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाºयांसाठी शासकीय निवासस्थाने बांधून देण्याची मागणी केली आहे. महापालिका प्रशासनाने अद्याप कारागृहाच्या प्रस्तावाचा विचार केला नसल्याने बिंदू चौक कारागृहाच्या स्थलांतराचा प्रस्ताव रखडला आहे. या स्थलांतरासाठी महापालिका प्रशासनाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी तयार असलेल्या प्रस्तावाला मंजुरी देऊन, राज्य शासनाकडे पाठपुरावा करून मंजुरी घेणे आवश्यक आहे.
आराखड्यात उल्लेख
‘अंबाबाई विकास आराखड्या’मध्ये उपकारागृह कळंब्याला हलवून या ठिकाणी अंबाबाईसाठी येणाºया भाविकांसाठी पार्किंग करण्यासाठी मंजुरी घेतली आहे. मात्र, कारागृह प्रशासनास शासकीय निवासस्थाने बांधून देण्यासंबंधी कोणताच निर्णय घेतलेला नाही. महापालिका आयुक्तांनी यासंबंधी सकारात्मक निर्णय घेतल्यास जिल्हाधिकाºयांतर्फे शासनाला प्रस्ताव पाठवून स्थलांतराचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
कळंबा मध्यवर्ती कारागृहाकडे बिंदू चौक उपकारागृहाचे (सबजेल) स्थलांतर करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासंबंधी प्रस्ताव जिल्हाधिकारी, महापालिका व कारागृह या तिन्ही स्तरांवर तयार केला आहे. राज्य शासन आणि महापालिका प्रशासनाने कारागृह अधिकारी आणि कर्मचाºयांना पद्माळा परिसरात शासकीय निवासस्थाने बांधून देण्याचा निर्णय घेतल्यास स्थलांतराचा प्रश्न लवकर मार्गी लागेल. - शरद शेळके, कळंबा कारागृह अधीक्षक