प्रदर्शनामुळे तंत्रज्ञान बांधापर्यंत
By admin | Published: February 3, 2015 11:39 PM2015-02-03T23:39:03+5:302015-02-03T23:58:21+5:30
अजित पवार : भीमा कृषी, पशु व पक्षी प्रदर्शनाचा समारोप
कोल्हापूर : कृषी प्रदर्शन ही काळाची गरज बनली आहे. यामधून अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत असून शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होत आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे केले.
मेरी वेदर ग्राउंड मैदानावर आयोजित चार दिवसीय भीमा कृषी, पशु व पक्षी प्रदर्शनाचा समारोप व पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी अजित पवार यांच्या हस्ते संजिवनी अॅग्रो फळे व फुले खरेदी-विक्री केंद्र (तमदलगे, ता. शिरोळ) यांना ‘भीमा कृषिरत्न पुरस्कार’ व द्राक्षगुरु वसंतराव माळी (पलूस, जि. सांगली) यांना ‘भीमा कृषी जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.अजित पवार म्हणाले, काही लोक स्वार्थासाठी अशी प्रदर्शने भरवितात; परंतु खासदार धनंजय महाडिक यांनी सामाजिक भावनेतून गेल्या दहा वर्षांपासून कृषी प्रदर्शन सुरू ठेवले आहे. सध्या शेतीकामासाठी मजूर मिळेनात, अशी स्थिती आहे. ती कमतरता भरून काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांनी करून घेत त्याचा उपयोग केल्यास मजुरांअभावी काम थांबण्याची वेळ येणार नाही. शेतीला भरपूर पाणी दिले जायचे; परंतु हे चित्र आता बदलू लागले आहे. आता ठिबक सिंचनाच्या वापरामुळे पाण्याची बचत होऊ लागली असून त्याचा वापर शेतीसाठी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशा प्रकारची कृषी प्रदर्शन ही काळाची गरज बनली आहेत. यामधून अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत असून त्याचा लाभदेखील आता दिसत आहे. आपला शेतकरीदेखील हायटेक होत असल्याचे हे चित्र आहे. भीमा कृषी प्रदर्शन त्याला पूरक काम करते.
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून एकप्रकारे धनंजय महाडिक मार्केटिंग करत आहेत. त्यामुळे हे प्रदर्शन दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून आपण कृषी प्रदर्शन भरवत असून लाखो लोकांना त्याचा फायदा होत आहे. या माध्यमातून शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती लोकांना होत आहे.
यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, जिल्हा परिषद सदस्य ए. वाय. पाटील, अरुंधती महाडिक, करवीर
पंचायत समिती सदस्या अरुणिमा माने आदी उपस्थित होते. ताज मुलाणी यांनी सूत्रसंचालन केले. रामराजे कुपेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कृषी व सहकार ही महाराष्ट्राची शक्तिस्थळे
कृषी आणि सहकार ही महाराष्ट्राची शक्तिस्थळे आहेत. त्यामुळे राज्याची वाटचाल प्रगतिपथावर राहिली आहे. सरकार व्होडाफोनला ३२००कोटी रुपयांचा करमाफी देते; परंतु शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देत नाही, हे कसले ‘अच्छे दिन’ अशा शब्दांत पवार यांनी यावेळी बोचरी टीका केली.