Kolhapur: लघुउद्योजकांचा 'विकास' कधी?, जागेचा तिढा सुटेना; उद्योगमंत्र्यांना विसर
By पोपट केशव पवार | Published: September 24, 2024 05:51 PM2024-09-24T17:51:47+5:302024-09-24T17:52:08+5:30
लघुउद्योजकांची जागा क्रिकेट स्टेडियमला
पोपट पवार
कोल्हापूर : जिल्ह्यातील औद्योगिकीकरणाला सर्वाधिक बळ देणाऱ्या लघुउद्योजकांसाठी विकासवाडी (ता. करवीर) येथे २० हेक्टर जागा देण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. मात्र, एक वर्ष झाले तरी या जागेचा प्रस्ताव पुणे विभागीय कार्यालयाकडे प्रलंबित आहे. मागून आलेला क्रिकेट स्टेडियमचा प्रस्ताव मंजूर झाला. मात्र, लघुउद्योजकांच्या जागेबाबत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने लघुउद्योजकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल-पंचतारांकित या तिन्ही एमआयडीसींमध्ये साडेतीन हजारांहून अधिक लघुउद्योजक आहेत. मशीन शॉप, फॅब्रिकेटर्स व फाउंड्री उद्योगाशी संलग्नित विवध छाेटे उद्योग या एमआयडीसींमध्ये कार्यरत आहेत. काही ठराविक अपवाद वगळता बहुतांश सर्वच छोटे उद्योग भाड्याच्या जागेत असल्याने सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा या उद्योजकांना मिळत नाहीत. त्यामुळे लघुउद्योजकांना एमआयडीसींमध्ये हक्काची जागा द्या, अशी मागणी इंजिनिअरिंग कंपोनंट्स मशिनिंग ओनर वेल्फेअर असोसिएशन (एक्मो) या संघटनेने गेल्या दोन वर्षांपासून लावून धरली होती.
त्यानंतर उद्योगमंत्री सामंत यांनी विकासवाडी येथे एमआयडीसीची २० हेक्टर जागा लघुउद्योजकांना देण्याची घोषणा केली. विकासवाडी येथे प्रस्ताविक एमआयडीसीचा प्रस्तावही पुणे विभागीय कार्यालयाकडे गतवर्षी पाठवण्यात आला. मात्र, त्यानंतर या जागेबाबत प्रशासकीय पातळीवर कोणतीच हालचाल झालेली नाही. उद्योगमंत्र्यांना या घोषणेचा विसर पडला की लघुउद्योजकांना जागा न देता नुसते झुलवत ठेवायचे आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लघुउद्योजकांची जागा क्रिकेट स्टेडियमला
विकासवाडी येथील एमआयडीसीच्या ताब्यातील २० हेक्टर जागा लघुउद्योजकांना देण्याचे उद्योगमंत्र्यांनी जाहीर केले होते. आता याच जागेतील १२ हेक्टर जागा क्रिकेट स्टेडियमला दिली आहे. सर्वाधिक महसूल, सर्वाधिक रोजगार उपलब्धी करूनही आमच्यावरच अन्याय का? असा सवाल ‘एक्मो’चे अध्यक्ष अमित पाटील यांनी उपस्थित केला.
सध्या ९० टक्के लघुउद्योजकांनी भाड्याच्या जागेत उद्योग उभारले आहेत. लघुउद्योजकांना हक्काची जागा मिळाली तर शासनाच्या सर्व सुविधा, बँकांचे कर्ज मिळू शकते. लघुउद्योगांमुळे जिल्ह्यात सर्वाधिक रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे सरकारने त्वरित जागा द्यावी. - अमित पाटील, अध्यक्ष, इंजिनिअरिंग कंपोनंट्स मशिनिंग ओनर वेल्फेअर असोसिएशन (एक्मो)
एमआयडीसी प्रशासनाने उद्योगांसाठी सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. लघुउद्योजकांच्या जागेचाही प्रश्न त्यांनी सोडवावा. - स्वरूप कदम, अध्यक्ष, गोशिमा.