जलतरण संघटनांतील वाद उफाळला, वेगवेगळ्या दिवशी निवड चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:39 AM2019-05-13T11:39:06+5:302019-05-13T11:40:26+5:30
राज्याच्या क्रीडा कार्यालयाने एकोणीस खेळांची मान्यता रद्द केल्यानंतर जलतरण संघटनांमधील वाद उफाळला आहे. यात एका संघटनेची निवड चाचणी स्पर्धा १६ मे ला, तर दुसऱ्या संघटनेची स्पर्धा १८ मे ला होणार आहे. त्यामुळे पालक व खेळाडूंमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
कोल्हापूर : राज्याच्या क्रीडा कार्यालयाने एकोणीस खेळांची मान्यता रद्द केल्यानंतर जलतरण संघटनांमधील वाद उफाळला आहे. यात एका संघटनेची निवड चाचणी स्पर्धा १६ मे ला, तर दुसऱ्या संघटनेची स्पर्धा १८ मे ला होणार आहे. त्यामुळे पालक व खेळाडूंमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी सवलत (ग्रेस) गुणांकरिता अनेक संघटनांच्या जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या. मात्र, त्यातील काही संघटनांची मान्यता राज्य, राष्ट्रीय पातळीवर नसल्याने क्रीडा कार्यालयाने या खेळाडूंचे प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने ते पाठविले नाहीत. याकरिता तीन वेळा प्रस्ताव पाठविण्यासाठी मुदतवाढही दिली.
या सर्व प्रकारामुळे खेळाडूंचे नुकसान झाले. त्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जलतरण खेळ प्रकारात दोन संघटना निर्माण झाल्या आहेत. यात एक पालकांची संघटना असून, त्याला स्विमिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्रने मान्यता दिली आहे, तर २९ वर्षांपूर्वीची कोल्हापूर जलतरण संघटना यांच्यामध्ये आता स्पर्धा घेण्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे नव्या पालकांच्या संघटनेची निवड चाचणी स्पर्धा शनिवारी (दि. १८) आहे. या स्पर्धेतून निवडला जाणारा संघ पुणे येथील बालेवाडीमध्ये ३१ मे व १ आणि २ जून दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय सब-ज्युनिअर व ज्युनिअर जलतरण स्पर्धेसाठी खेळणार आहे, तर जुन्या संघटनेची निवड चाचणी स्पर्धा गुरुवारी (दि. १६ मे) सागर पाटील जलतरण तलाव येथे होणार आहे. यातून निवडला जाणारा संघ नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे. याबाबत अधिकृतरीत्या माहिती सांगण्यास दोन्ही संघटनांच्या सूत्रांनी नकार दिला आहे.