Kolhapur Politics: संघर्षाच्या शापाचे कागलकरांना चटके, मुश्रीफ-घाटगे वादाने पुन्हा अशांतता
By राजाराम लोंढे | Published: February 27, 2023 07:01 PM2023-02-27T19:01:28+5:302023-02-27T19:03:38+5:30
संघर्षाला आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची किनार
राजाराम लोंढे
कोल्हापूर : कागलला राजकीय संघर्ष नवीन नसला, तरी गेल्या आठ वर्षांपासून मंडलीक-मुश्रीफ यांच्यातील वाद शांत झाल्याने कागलकर गुण्यागोविंदाने नांदताना दिसत होते. मात्र, आता मुश्रीफ-घाटगे यांच्यात राजकीय संघर्ष कागलमध्ये उफाळला आहे. या संघर्षाला आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची किनार असून, काँग्रेस, राष्ट्रवादीची शक्तिस्थळे असलेल्या ‘केडीसीसी’ बँक व ‘गोकुळ’वर विरोधकांनी हल्ले करण्यास सुरुवात केल्याने नजीकच्या काळात वार-प्रतिवाराचे राजकारण नव्याने पेट घेणार, हे निश्चित आहे.
स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे, रत्नाप्पाण्णा कुंभार, उदयसिंगराव गायकवाड, बाळासाहेब माने यांच्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कागल तालुकाच राहिला. स्वर्गीय सदाशिवराव मंडलीक यांनी जवळपास पंधरा वर्षे नेतृत्व केले. त्यांच्यानंतर हसन मुश्रीफ यांच्याकडे नेतृत्व आले, यासाठी जिल्हा बँकेची सत्ता हे जरी कारणीभूत असले, तरी जिल्हाभर कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्याची ताकद या नेत्यांकडे होतीच, त्याचबरोबर कोणत्याही पातळीवर संघर्षाची तयारी होती.
जिल्ह्यातील नेत्यांसोबत लढाई करत असतानाच, कागलमधील विरोधकांशीही त्यांना लढावे लागले. त्यातूनच स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे व सदाशिवराव मंडलीक यांच्यातील संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने पाहिला आहे. त्यानंतर, मंडलीक व हसन मुश्रीफ यांच्यातील संघर्ष टोकाला गेला होता, आठ वर्षे या संघर्षात कागलच्या सामान्य जनतेला अनेक वेळा चटके सोसावे लागले. मुश्रीफ व संजय घाटगे यांच्यातील संघर्षही सर्वांनी पाहिला आहे.
२०१५ च्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुश्रीफ यांनी संजय मंडलीक यांना पॅनलमध्ये घेऊन विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पुन्हा मंडलीक, मुश्रीफांनी समझोत्याचे राजकारण सुरू ठेवत जिल्ह्याचे नेतृत्व आपल्या हातून सुटू दिले नाही. दहा वर्षे मुश्रीफ यांच्यासोबत असणारे समरजीत घाटगे यांनी २०१९ ला त्यांच्याविरोधात लढले. पराभव झाल्यापासून ते नेटाने कामाला लागले, येथपर्यंत ठीक होते. आता नव्याने घाटगे-मुश्रीफ यांच्यात संघर्ष सुरू झाला असून, यातून तयार झालेल्या ठिणगीचा वणवा पेटला, तर यामध्ये कागलातील सामान्य कार्यकर्ते होरपळून निघणार आहेत.
जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही, त्यांची सल आहे. ती कोणत्याही राजकीय पक्षांना असतेच. मात्र, त्यासाठी वाटेल ते करण्याच्या वृत्तीने सध्या सामान्य माणसात मात्र अस्वस्थता दिसत आहे. आगामी लोकसभा व विधानसभेला यश मिळवायचे असेल, तर हसन मुश्रीफ व सतेज पाटील या शक्तिस्थळांवर हल्ले केले पाहिजे, हे साधे गणित भाजपचे आहे. यातूनच मुश्रीफ यांना घेरले आहे. ‘गोकुळ’चे चाचणी लेखापरीक्षण लावून सतेज पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांचा आहे.
राजकीय संघर्षात शेतकऱ्यांचे नुकसान नको
‘केडीसीसी’ बँक व ‘गोकुळ’ हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अर्थवाहिन्या आहेत. या दोन्ही संस्थांच्या भोवती जरी जिल्ह्याचे राजकारण फिरत असले, तरी राजकीय संघर्षात या संस्थांच्या अस्तित्वाला धक्का लागला, तर शेतकरी रस्त्यावर येण्यास वेळ लागणार नाही.