...अन् शिवसैनिक मुरलीधर जाधव ढसाढसा रडले; उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 04:16 PM2024-01-05T16:16:52+5:302024-01-05T16:22:15+5:30
बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला मी कार्यकर्ता आहे. मी आजही उद्धव ठाकरेंना दैवत मानतो. माझ्याबद्दल उद्धव ठाकरेंचे कान भरलेले आहेत असा आरोप त्यांनी केला.
कोल्हापूर - हातकंणगले मतदारसंघावरून शिवसेना उबाठा गटात वादळ उठलं आहे. राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भैटीवर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी आक्षेप घेतला. त्यावरून जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या हकालपट्टीनंतर मुरलीधर जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. इतकी वर्ष पक्षासाठी झटून माझ्यावर अन्याय झाला अशी भावना त्यांनी व्यक्त केली त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.
मुरलीधर जाधव म्हणाले की, मी जे विधान केले त्यावर कुठेही मातोश्रीवर कुणी भेटावे कुणी नाही हे बोललो नाही. पक्षासाठी झीज करणारा १९ वर्ष जिल्हाप्रमुख आहे. ५ वर्ष शहरप्रमुख म्हणून काम केले. अंगावर प्रसंगी चाकूचे वार झेलले. पोलिसांचा मार खाल्ला आहे. मग मी पक्षासाठी का उभा राहू नये असं मला का वाटू नये? आपल्यासोबत कोण राहिलं याचा विचार करायला हवा होता. राजू शेट्टी यांना विरोध एवढ्यासाठीच की २०१४ ला महायुतीच्या माध्यमातून राजू शेट्टी यांना निवडून दिले. त्यानंतर विधानसभेत राजू शेट्टी भाजपासोबत गेले तेव्हा माझ्यासारख्या शिवसैनिकांना किती वेदना झाल्या असतील. बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला मी कार्यकर्ता आहे. मी आजही उद्धव ठाकरेंना दैवत मानतो. माझ्याबद्दल उद्धव ठाकरेंचे कान भरलेले आहेत असा आरोप त्यांनी केला.
तसेच सुचित मिणचेकर गेल्या ४ महिन्यापासून मुरलीधर जाधवांना पदमुक्त करा असा प्रयत्न सुरू आहे. सुजित मिणचेकरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्येक गावांत चाचपणी सुरू होती. शिंदे गटात गेलो तर कसे होईल. मुरलीधर जाधवांना पदावरून कमी करणार असाल तर मी पक्षात थांबतो अशी भूमिका मिणचेकरांनी घेतली. परवाचे निमित्त फार मोठे नव्हते. १९ वर्ष मी पक्षासाठी काम केले. रस्त्यावर मी आंदोलन करत असताना आमदार गाणी म्हणत होते. माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकांनी डोक्यात गोळी घालण्याचं बाकी आहे. इतका माझ्यावर अन्याय झाला असं मुरलीधर जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, मातोश्रीवर साहेबांना भेटायला गेलो तर साहेबांच्या बाजूची चार पाच माणसं भेटतात. त्यांना काम सांगायचे. मग भावना कुणासमोर मांडायच्या. शिंदेंच्या बंडानंतर पक्ष अडचणीत होतो. तेव्हा आमदाराने एकही प्रतिज्ञापत्र दिलं नाही. पूर्ण ताकदीनिशी मी साहेबांच्या मागे उभे राहिलो. सर्वाधिक प्रतिज्ञापत्र दिली. मला बोलवून सांगायला हवं होतं. मुरली तुझं चुकलं. १९ वर्ष जिल्हाप्रमुख, ३ वर्ष तालुकाप्रमुख, ५ वर्ष शहरप्रमुख इतकं असून अर्धा मिनिटांच्या भावनेत तुम्ही माझी हकालपट्टी केली. मी पक्षाबद्दल आणि उद्धव ठाकरेंबाबत एकही वाक्य चुकीचे बोललो नाही. मला शिवसेना या चार शब्दाने मोठे केले असं मुरलीधर जाधव यांनी म्हटलं.