kdcc bank election : आवाडे भाजपच्या कोट्यातून, सेनेला मिळणार आणखी एका जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 04:24 PM2021-12-15T16:24:07+5:302021-12-15T16:25:09+5:30
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्तारूढ गटाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महाविकास आघाडीबरोबरच भाजपलाही सोबत घेण्याची भूमिका सत्तारूढ गटाने घेतली आहे.
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी सत्तारूढातील नऊ जागांचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपच्या कोट्यातून आमदार प्रकाश आवाडे यांना, तर शिवसेनेला आणखी जागा देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. शिवसेनेला महिला किंवा इतर मागासवर्गीय यापैकी एक जागा मिळू शकते. ही जागा कोणत्या गटाला द्यायची, हे त्या त्या तालुक्यातील अंतर्गत राजकारणावर ठरणार आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्तारूढ गटाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महाविकास आघाडीबरोबरच भाजपलाही सोबत घेण्याची भूमिका सत्तारूढ गटाने घेतली आहे. भाजपची संस्थात्मक पातळीवरील ताकद पाहिली, तर महादेवराव महाडिक, अशोक चराटी यांच्याकडे चांगली आहे. महाडिक, चराटी हे विकास संस्था गटातून बँकेत येऊ शकतात. त्याशिवाय नऊपैकी एक जागा देऊन विरोधी पॅनेलची हवा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातूनच भाजपचे सहयाेगी सदस्य प्रकाश आवाडे यांना ‘पतसंस्था’ गटातून उमेदवारी दिली आहे.
शिवसेनेची एक-दोन तालुके वगळता सर्वत्र संस्थात्मक पातळीवर ताकद आहे. त्यामुळे केवळ दोनच जागांवर बोळवण करू नका, आणखी एक जागा द्या, असा आग्रह शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी धरला आहे. तिसरी जागा मिळविण्यासाठी खासदार संजय मंडलिक यांच्यावर शिवसेना नेत्यांचा दबाव आहे. त्यातूनच महिला किंवा इतर मागासवर्गीय जागा देण्याबाबत खल सुरू आहे. ही जागा मिळाली, तर करवीर, भुदरगड की गडहिंग्लजमध्ये द्यायची, यावरही चर्चा झाली आहे. एकूण राजकीय हालचाली पाहता, महाविकास आघाडीतील तालुक्याअंतर्गत राजकारण पाहता, भुदरगड व करवीरमध्ये शिवसेनेला उमेदवारी देण्यास विरोध होऊ शकतो.
‘स्वाभिमानी’थांबणार की लढणार
- विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर ‘स्वाभिमानी’ने भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून उमेदवारी मागितली होती.
- त्यानंतर शिरोळ विकास संस्था गटातून गणपतराव पाटील यांच्या उमेदवारीसाठी राजू शेट्टी आग्रही राहिले. पाटील यांना स्वीकृत घेण्याचा शब्द त्यांना दिल्याचे समजते.
- त्यामुळे भटक्या विमुक्त गटातील उमेदवारीवरील दावा काहीसा कमी झाल्याची चर्चा सुरू आहे. येथून काँग्रेस आपला उमेदवारी देणार असल्याने ‘स्वाभिमानी’ थांबणार की लढणार, याविषयी उत्सुकता आहे.
असे होऊ शकते नऊ जागांचे वाटप-
प्रक्रिया संस्था - शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस
दूध व इतर संस्था - राष्ट्रवादी काँग्रेस
पतसंस्था - भाजप (प्रकाश आवाडे)
अनुसूचित जाती- काँग्रेस
भटक्या विमुक्त जाती - काँग्रेस
इतर मागासवर्गीस- जनसुराज्य पक्ष किंवा राष्ट्रवादी
महिला - शिवसेना व पी. जी. शिंदे गट किवा शिवसेना