तायक्वाँदोतील वाद संपुष्टात
By admin | Published: July 12, 2016 06:55 PM2016-07-12T18:55:31+5:302016-07-13T00:51:27+5:30
महासंघाची निवड : अध्यक्षपदी चेतन आनंद, उपाध्यक्षपदी विनायक गायकवाड
शिरगाव : भारतीय तायक्वाँदो महासंघामध्ये अधिकृत संघटना कोणती? असा गेले काही वर्षापासून सुरु असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या निर्देशानुसार २६ जून रोजी नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या तायक्वाँदो महासंघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे वकील चेतन आनंद यांची निवड झाली असून, तायक्वाँदो असोसिएशन आॅफ महाराष्ट्रचे विनायक गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
भारतीय तायक्वाँदो महासंघाचे माजी पदाधिकारी हरिशकुमार यांच्या पॅनेलचा पराभव झाल्याने भारतीय तायक्वाँदो महासंघ या अधिकृत संघटनेच्या कार्यकारिणीला भारतीय आॅलिम्पिक महासंघाने मान्यता दिली आहे. दि. २४ नोव्हेंबर २०१४ रोजी भारतीय तायक्वाँदो महासंघाच्या तत्कालीन अध्यक्षा रेणू महंत यांच्याविरुध्द विशेष सर्वसाधारण सभेत अविश्वास ठराव मंजूर झाल्याने वाद निर्माण झाला. घटनाबाह्य कामे, भ्रष्टाचार, नियमबाह्य अॅकॅडमीची स्थापना व अनेक गैरव्यवहारांमुळे तायक्वाँदो पदाधिकाऱ्यांतध्ये विरोधी लाट तयार झाली. सर्वत्र निर्माण झालेल्या समांतर अनधिकृत संघटनांमुळे अधिकृत संघटना कोणती? याबाबत देशभरातील खेळाडू, पालक, क्रीडा संघटक यांच्यात संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर विनायक गायकवाड यांनी देशभरातील २६ राज्य संघटना पदाधिकाऱ्यांना वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या निर्देशानुसार निवडणूक घेण्याचा निर्णय झाला.
यावेळी झालेल्या निवडणुकीत राज ककाटी व हरिशकुमार यांचे पॅनलमध्ये लढत झाली. यामध्ये राज ककाटी यांचे पॅनेलने सर्व १७ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर अध्यक्षपदी अॅड. चेतन आनंद, उपाध्यक्ष विनायक गायकवाड, सचिव प्रभात शर्मा (झारखंड), कोषाध्यक्ष सोकून सिंग (अरुणाचल प्रदेश), आर. डी. मंगेशकर (गोवा), टी. प्रवीणकुमार (कर्नाटक), इशारी के. गणेश (तामिळनाडू), सहसचिव संजयकुमार शर्मा, डी. एन. पंगोत्रा, दीपक मंदेकर यांच्यासह सदस्यपदी त्रिलोक सुब्बा, संतोषकुमार माहंरी, विनोदकुमार, सुरेश परमार, तारा तागिन, अनिल भार्गव, पी. स्टॅलीन यांची निवड करण्यात आली आहे. (वार्ताहर)