वादग्रस्त माले सोसायटीतील लॅपटॉप गायब
By Admin | Published: January 30, 2015 12:50 AM2015-01-30T00:50:14+5:302015-01-30T00:52:10+5:30
सचिवांची तक्रार : चौकशीस काहींचा मुद्दाम विरोध : ‘लोकमत’चा पाठपुरावा
कोल्हापूर : माले-माळवाडी (ता. पन्हाळा) येथील भैरवनाथ सेवा सोसायटीतील सर्व व्यवहारांची इत्थंभूत माहिती असणारा संस्थेच्याच मालकीचा लॅपटॉप गायब झाला असल्याची तक्रार त्यास संस्थेचा सचिव गुलाब घनश्याम सोळसे याने केली आहे. सोळसे यांने गैरव्यवहार केल्याची संचालक मंडळाची तक्रार आहे परंतु ज्यांनी गैरव्यवहार केला त्यांचे बिंग फुटू नये अशांनीच हा लॅपटॉप गायब केल्याचा संशय सोळसे याने व्यक्त केला आहे.
‘लोकमत’मध्ये गेल्या आठवड्यात या सोसायटीतील गैरव्यवहाराचा पर्दाफाश करणारी वृत्तमालिका प्रसिद्ध झाली. त्याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने बँक निरीक्षक भरत घाटगे यास तडकाफडकी निलंबित केले.
जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी संस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी उपलेखापाल सागर बलकवडे यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी दोनवेळा संस्थेस भेट दिली व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत परंतु बँकेने सचिव चौकशीस सहकार्य करत नसल्याने त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे जाहीर केले होते. त्यासंबंधी सचिव सोळसे यांनी निवेदनाद्वारे आपली बाजू मांडली आहे.
निवेदनात म्हटले आहे,‘सोसायटीतील गैरव्यवहारास वाचा फोडल्याबद्दल मी ‘लोकमत’चा आभारी आहे. कारण त्यामुळे आता संस्थेच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी व लेखापरीक्षण होऊन नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होण्यास मदत होईल. बँकेचे व सहकार विभागाचे कोणतेही अधिकारी चौकशीसाठी आले असता मी कुठेही गायब झालेलो नाही. माझे घर संस्थेपासून ३५ पावलांवर आहे. लेखापरीक्षकांनी भेट दिली तेव्हा मी घरीच होतो. मध्यंतरी माझा अपघात झाल्यावर संस्थेच्या संचालक मंडळाने कार्यालयाचे कुलूप काढून नवीन कुलूप घातले. त्यामुळे लेखापरीक्षकांना दोन्ही वेळ चावी आणेपर्यंत तासभर ताटकळत थांबावे लागले.
कोंबडं झाकलं म्हणून...
लेखापरीक्षकांनी दप्तर काढून घेतले असता ज्या मुख्य मुद्द्यावर संस्थेत गैरव्यवहाराचा संशय आहे त्यासंबंधीची १) एक एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ अखेरची संस्थेची किर्द, डे-बुक, २) गायी-म्हशी कर्जप्रकरण व कर्जरोखे फाईल ३) संस्थेचे २०१३-१४ चे(२०११-१२ व २०१२-१३ समाविष्ट) कमाल मर्यादा पत्रक ४) संस्थेचे जिंदगी पत्रक ५) सन २०१२-१३, २०१३-१४ व १ एप्रिल २०१४ पासून पुढील आॅगस्टपर्यंतचा संस्थेचे सर्व दप्तर, जमा-खर्च संगणकीकृत असणारा संस्था मालकीचा ‘लॅपटॉप’ या बाबी संस्थेतून गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ज्या अफरातफरीचा गाजावाजा होत आहे, त्याची तज्ज्ञांकडून चौकशीच होऊ नये असे कोणास वाटते याचाही शोध घेतला जाण्याची आवश्यकता आहे. मी ज्या गोष्टींसाठी जबाबदार असेल त्याची शिक्षा भोगायला तयार आहे. कुणी कोंबडं झाकले म्हणून सूर्योदय व्हायचा राहणार नाही, याची मला खात्री आहे.
दप्तर ताब्यात..
उपलेखापरीक्षक सागर बलकवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशीची आवश्यक कागदपत्रे ताब्यात घेऊन कपाट सील केल्याचे सांगितले. निवडणुकीची घाई सुरू असल्याने चौकशी अद्याप सुरू केली नसल्याचे त्यांनी सांगितले.