Kolhapur News: वादग्रस्त स्टेटस..वातावरण स्फोटक; सोशल मीडियाच्या वापरास हवे गांभीर्य
By उद्धव गोडसे | Published: March 23, 2023 02:07 PM2023-03-23T14:07:18+5:302023-03-23T14:07:39+5:30
सोशल मीडियाचा गैरवापर करण्यात तरुणाई आघाडीवर
उद्धव गोडसे
कोल्हापूर : सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करण्यापेक्षा त्याचा दुरुपयोग करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. वादग्रस्त स्टेटस ठेवणे, महापुरुषांबद्दल बदनामीकारक मजकूर व्हायरल करणे, चिथावणीखोर भाषेचा वापर करून गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन देणे अशा घटनांमुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात चार ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे सोशल मीडियाच्या दुरुपयोगाचा गांभीर्याने विचार करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे.
गावोगावी हवे प्रबोधन
सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा चांगला वापर केल्यास फायदा होऊ शकतो. मात्र, गैरवापरामुळे स्वत:सोबत समाजाचेही नुकसान होते. याची वेळीच तरुणांना जाणीव करून देण्यासाठी गावोगावी प्रबोधन होणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालयांनाही त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.
घटना पहिली - सावर्डे (ता. हातकणंगले) येथे एका तरुणाने महापुरुषांच्या बदनामीचा स्टेटस व्हॉट्सॲपवर ठेवला. या घटनेचे पडसाद परिसरातील मिणचे आणि खोची या गावांमध्ये उमटले. व्हॉट्सॲपच्या स्टेटसला निदर्शनांनी उत्तर देण्यात आले. तरुणांनी गावोगावी दुचाकी रॅली काढून घोषणाबाजी केली. गुन्हे दाखल करण्यासाठी पेठ वडगाव पोलिस ठाण्याबाहेर जमावाने ठिय्या मारला आणि गावोगावी बंदही पाळण्यात आला.
घटना दुसरी - व्यवसायानिमित्त शिरोळमध्ये येऊन राहिलेल्या एका कुटुंबातील तरुणाने राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचा स्टेटस ठेवला. काही तासांत हा स्टेटस व्हायरल झाला आणि शिरोळ तालुक्यातील वातावरण तापले. संबंधित तरुणाच्या विरोधात निदर्शने सुरू असतानाच तक्रारदार तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याने पुन्हा वातावरण चिघळले. अखेर पोलिसांनी दोषीवर गुन्हा दाखल केला आणि त्या कुटुंबाला गाव सोडून जावे लागले.
सामाजिक स्वास्थ्य धोक्यात
सोशल मीडियातील वादाचे परिणाम काही क्षणात समाजावर होतात. बंद, निदर्शने यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण होते. शाळा, महाविद्यालये यासह दैनंदिन व्यवहारांवर त्याचा गंभीर परिणाम होतो. आर्थिक व्यवहारही मंदावतात. जाती-धर्मामध्ये तेढ वाढल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते.
तरुणाईचे भवितव्य अंधारात
सोशल मीडियाचा गैरवापर करण्यात तरुणाई आघाडीवर आहे. एखाद्या चुकीच्या कृतीचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याची काहीच कल्पना नसणारे तरुण बेफिकीरपणे वाटेल ते मेसेज फॉरवर्ड करतात. निदर्शने, मोर्चांमध्ये ते सहभागी होतात. यामुळे होणाऱ्या पोलिस कारवाईनंतर तरुणांचे करिअर धोक्यात येते. याचा तरुणांसह त्यांच्या पालकांनीही वेळीच विचार करण्याची गरज आहे.
हे करणे टाळा
- सोशल मीडियात वादग्रस्त मेसेज करू नका
- वाद निर्माण होतील, असे स्टेटस ठेवू नका
- चिथावणीखोर भाषेचा वापर टाळा
- गुन्हेगार, गुंडांचे उदात्तीकरण नको
- धार्मिक मुद्द्यांवर चुकीचे भाष्य करू नये
- अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर नको
- निदर्शने, मोर्चे, रॅली यात सहभाग टाळा
सोशल मीडियातील चुकीच्या मेसेजमुळे निर्माण होणारा तणाव संपूर्ण समाजाची शांतता धोक्यात आणतो. याचे दीर्घकालीन परिणाम उमटत राहतात. त्यामुळे तरुणांनी जपून सोशल मीडियाचा वापर करावा. दोषींवर कठोर कारवाई केली जात आहे. - शैलेश बलकवडे - पोलिस अधीक्षक