खर्डा-भाकरी खाऊन शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:54 AM2018-08-13T00:54:17+5:302018-08-13T00:54:21+5:30

Disregard of government by eating cough and cough | खर्डा-भाकरी खाऊन शासनाचा निषेध

खर्डा-भाकरी खाऊन शासनाचा निषेध

Next

कोल्हापूर : मराठा आरक्षण मागणीसाठी सीमाभागातील मराठी बांधवांनी रविवारी रॅली काढून दसरा चौकात ठिय्या आंदोलनस्थळी खर्डा-भाकरी खाऊन शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. याशिवाय शिरोळ, राधानगरी तालुक्यांतीलही विविध गावांनी शक्तिप्रदर्शन दाखवीत ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदविला.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी दसरा चौकात सकल मराठा ठोक मोर्चाच्या वतीने गेले वीस दिवस अखंडपणे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे. अनेक मराठा समाजबांधव हातात भगवा झेंडा व डोक्यावर भगवी टोपी परिधान करून ठिय्या आंदोलनात सहभागी होत आहेत. बुधवारी झालेल्या ‘कोल्हापूर बंद’नंतर या आंदोलनाची धग वाढत आहे.
रविवारी दुपारी महाराष्टÑ सीमाभागातील मांगूर (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथील ग्रामस्थांनी रॅली काढली. सकाळी मांगूर ग्रामस्थांनी गावातून मराठा आरक्षणाचा जागर करीत दुपारपर्यंत कोल्हापुरात दसरा चौक गाठला. त्यावेळी ‘जय भवानी- जय शिवाजी,’ ‘मराठा आरक्षण आमच्या हक्काचे...’ अशा घोषणा देत व्यासपीठावर ठिय्या आंदोलन केले. या ग्रामस्थांचे नेतृत्व निवृत्त पोलीस उपअधीक्षक मोहन माने यांनी केले. यावेळी मराठा आरक्षणाबाबत शासनाकडून निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी खर्डा-भाकरी-दही खाऊन शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी उपस्थित सुमारे एक हजाराहून अधिक जणांनी खर्डा-भाकरीचा लाभ घेतला. यामध्ये आदित्यराज डफळे, विनायक शिंदे, अमरसिंह बागल, कुणाल इंगळे, धनराज शिंदे, दिग्विजय घोरपडे, रविराज निंबाळकर, संजय घाटगे, चंद्रकांत पाटील अनंतसिंह शितोळे, विनायक घोरपडे, आदींचा समावेश होता.
राधानगरी-भुदरगड मतदारसंघाचा वरचष्मा
या आंदोलनाची धग वाढत असतानाच रविवारी राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील ग्रामस्थांचा वरचष्मा दिसून आला. या भागातील ठिकपुर्ली, मजरे, कासारवाडा, कपिलेश्वर, पालकरवाडी, कसबा वाळवे, आदी गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये कसबा वाळवेचे सरपंच अशोक फराकटे, उपसरपंच सुनील मांडवकर यांचाही समावेश होता.
बर्फीचेही वाटप
राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली येथील प्रसिद्ध बर्फीचे बॉक्स ग्रामस्थ घेऊन आले होते. त्यांनी या प्रसिद्ध बर्फीचे उपस्थितांमध्ये वाटप केले. त्यावेळी त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने साऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी हे ग्रामस्थ दुचाकी रॅलीने कोल्हापुरात ठिय्या आंदोलनस्थळी आले होते.
शिरोळकरांनीही लक्ष वेधले
सकल मराठा समाज शिरोळ ग्रामस्थांच्या वतीने गावात रॅली काढून कोल्हापुरात दसरा चौकात ठिय्या आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दर्शविला. त्यामध्ये धैर्यशील माने-पाटील, चंद्रशेखर पाटील, किशोर पाटील, यशवंत देसाई, एस. माने, आदींचा सहभाग होता.

Web Title: Disregard of government by eating cough and cough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.