लसीकरण केंद्रावर वकिलांना अवमानास्पद वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:18 AM2021-06-10T04:18:14+5:302021-06-10T04:18:14+5:30
इचलकरंजी : लसीकरणासाठी आलेल्या वकिलांना अवमानास्पद वागणूक देत डॉक्टरांनी रांगेतून बाहेर काढले. हा प्रकार गावभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला. ...
इचलकरंजी : लसीकरणासाठी आलेल्या वकिलांना अवमानास्पद वागणूक देत डॉक्टरांनी रांगेतून बाहेर काढले. हा प्रकार गावभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला. यामुळे संतप्त झालेल्या वकिलांनी संंबंधितांना योग्य त्या सूचना व समज देऊन त्यांचा लेखी माफीनामा इचलकरंजी बार असोसिएशनला द्यावा, अशी मागणी केली आहे.
पत्रात, जिल्हा न्यायाधीशांच्या सूचनेनुसार वकिलांना लसीकरण करणाची प्रक्रिया महिन्याभरापासून प्रलंबित आहे. त्यासाठी असोसिएशनकडून नगरपालिकेस लसीकरणासाठी यादी दिलेली असून, स्वतंत्र कॅम्प घेण्याची मागणी केली आहे. त्यानुसार काही वकील बुधवारी आरोग्य केंद्रात गेले. त्यावेळी अधिकारी डॉ. काटकर यांनी अवमानास्पद वागणूक देत वकिलांना रांगेतून बाहेर काढले. त्यावेळी न्यायालयाचा सही-शिक्का असलेला विहित नमुन्यातील अर्ज त्यांना दाखविण्यात आला असतानाही उद्धटपणाची वागणूक मिळाली. ही बाब गंभीर असून, संबंधित अधिका-यांना योग्य त्या सूचना व समज द्यावी. तसेच त्यांच्याकडून लेखी माफीनामा असोसिएशनला पाठविण्याचा आदेश द्यावा, असे नमूद केले आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष अॅड. विवेक तांबे व सचिव अॅड. विशाल जाधव, अॅड. इसाक समडोळे व प्रवीण फगरे उपस्थित होते.