सातारा बसस्थानकात संतप्त प्रवाशांकडून तोडफोड

By admin | Published: September 17, 2015 11:36 PM2015-09-17T23:36:02+5:302015-09-17T23:44:42+5:30

परस्परविरोधी तक्रारी : सहायक वाहतूक निरीक्षकांनी फोनवर शिवीगाळ केल्याचा आरोप

Disrupted by angry passengers at Satara bus stand | सातारा बसस्थानकात संतप्त प्रवाशांकडून तोडफोड

सातारा बसस्थानकात संतप्त प्रवाशांकडून तोडफोड

Next

सातारा : मुंबई-आजरा प्रवासात इंजिनातील बिघाडामुळे एक ना दोन, तब्बल चार गाड्या बदलाव्या लागल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी येथील मध्यवर्ती बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षाची तोडफोड केली. प्रवास सुरू असताना सहायक वाहतूक निरीक्षकांना अनेकदा फोन करूनही त्यांनी तो घेतला नाही आणि नंतर स्वत: फोन करून शिवीगाळ केली, असा आरोप प्रवाशांनी केला. यासंदर्भात प्रवाशांनी, तर तोडफोडप्रकरणी एस.टी. प्रशासनाने चार प्रवाशांविरुद्ध तक्रार दाखल केली.प्रवासी, एस.टी.चे अधिकारी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकावर ही घटना घडली. वाहतूक नियंत्रण कक्षाच्या काचा प्रवाशांनी फोडल्या. आतील संगणक, दोन माईक आणि फोनचेही नुकसान केले. यावेळी झालेला आरडाओरडा आणि गोंधळामुळे बसस्थानकावरील इतर प्रवाशांबरोबरच एस.टी.चे कर्मचारीही प्रचंड घाबरले. सुमारे तासभर तणावपूर्ण वातावरण होते. त्यानंतर एस.टी. प्रशासनाने शिवाजी यशवंत बोरवडकर (वय ३५, रा. माद्याळ, ता. कागल, जि. कोल्हापूर), संदीप मारुती बिवळेकर (३५, रा. झुलपेवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर), संजय नारायण देवलकर (४२, रा. चाफवडे, ता. आजरा, जि. कोल्हापूर), आणि श्रीपती महादेव राजगोळे (५२, रा. न्यू पनवेल, जि. रायगड) या चार प्रवाशांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना समज दिली. ‘यापुढे कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल,’ अशी नोटीस चौघांना बजावल्यानंतर दुपारी एक वाजून एक मिनिटांनी प्रवाशांचा पुढील प्रवास सुरू झाला.दरम्यान, एकापाठोपाठ एक अशा चार बस नादुरुस्त झाल्यानंतर प्रवाशांपैकी श्रीपती महादेव राजगोळे यांनी सहायक वाहतूक निरीक्षक जी. बी. किरते यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. तथापि, तब्बल ३० वेळा फोन करूनही त्यांनी तो उचलला नाही, असे राजगोळे यांनी सांगितले. नंतर किरते यांनीच राजगोळे यांना उलटा फोन केला. तेव्हा झालेल्या बाचाबाचीत किरते यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप राजगोळे यांनी केला आहे. राजगोळे हे मुंबईत ‘बीईएसटी’मध्ये चालक म्हणून काम करतात. किरते यांच्याविरुद्ध त्यांनी शहर पोलीस ठाण्यात शिवीगाळीची तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)


आजरा-मुंबई...मुंबई-आजरा
आजरा-मुंबई बस मंगळवारी रात्री जेवणासाठी नागठाण्याजवळील ढाब्यावर थांबली असता, सशस्त्र दरोडेखोरांनी कुरिअरच्या कर्मचाऱ्याला धाक दाखवून सुमारे ३४ लाख रुपयांची लूट केली होती. दुसऱ्याच दिवशी नेमक्या मुंबई-आजरा बसलाच ‘ठेचेवर ठेच’ लागली आणि त्यामुळे प्रवाशांचा उद्रेक होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. मुंबई-आजरा मार्गावरील धावत्या बसवर हे सलग दुसरे ‘विघ्न’ नेमके विघ्नहर्त्याच्या आगमनावेळीच आले.

आजरा-मुंबई...मुंबई-आजरा
आजरा-मुंबई बस मंगळवारी रात्री जेवणासाठी नागठाण्याजवळील ढाब्यावर थांबली असता, सशस्त्र दरोडेखोरांनी कुरिअरच्या कर्मचाऱ्याला धाक दाखवून सुमारे ३४ लाख रुपयांची लूट केली होती. दुसऱ्याच दिवशी नेमक्या मुंबई-आजरा बसलाच ‘ठेचेवर ठेच’ लागली आणि त्यामुळे प्रवाशांचा उद्रेक होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. मुंबई-आजरा मार्गावरील धावत्या बसवर हे सलग दुसरे ‘विघ्न’ नेमके विघ्नहर्त्याच्या आगमनावेळीच आले.

Web Title: Disrupted by angry passengers at Satara bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.