अनियंत्रित कारभारामुळे कोल्हापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत-: अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 01:29 PM2018-10-01T13:29:20+5:302018-10-01T13:31:38+5:30
- भारत चव्हाण -
कोल्हापूर : माझ्या भागालाच आधी पाणीपुरवठा झाला पाहिजे, असा असलेला अट्टहास, त्यामुळे कर्मचाºयांकडून पाणी ‘सोड-बंद’ची चुकलेली वेळ, सर्वच अधिकाºयांचे संपूर्ण पाणीपुरवठ्यावरील सुटलेले नियंत्रण आणि मुख्य जलवाहिन्यांना देण्यात येत असलेले अनावश्यक फाटे अशा विविध कारणांनी होत असलेल्या अपुºया पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचा घसा कोरडा होण्याची वेळ आली आहे. ‘ज्याच्या हाती वाटी, तो बोटे चाटी’ या म्हणीप्रमाणे पाणीपुरवठ्याचा कारभार चालला असल्याने संपूर्ण शहराचे पाणीपुरवठ्याच्या वेळांचे नियोजन विस्कळीत झाले आहे.
राधानगरी तसेच काळम्मावाडी अशी दोन महत्त्वाची धरणे पूर्णपणे भरत असताना तसेच पंचगंगा नदी बारमाही वाहत असताना केवळ यंत्रणेचा निष्काळजीपणा तसेच अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे शहर पाणीपुरवठ्याचे तीन-तेरा वाजले आहेत. शहराचा विस्तार झाल्यानंतर पूर्वजांनी करून ठेवलेल्या तजविजीनंतर केवळ दाराजवळून वाहणाºया नदीतील पाणी घरापर्यंत पोहोचविण्याचे काम अद्याप महानगरपालिका प्रशासनास जमलेले नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांत एकीकडे पाणी नाही म्हणून तेथील नागरिक ओरड करतात आणि कोल्हापुरात प्रचंड पाणी असूनही ते व्यवस्थितपणे घरापर्यंत पोहोचत नाही म्हणून नागरिक हतबल झाले आहेत.
बालिंगा आणि कसबा बावडा येथून उपसा करून जलशुद्धिकरण केंद्रामार्फत कोल्हापूर शहराला पाणी दिले जाते. शहराचा विस्तार आणि पाण्याची मागणी वाढली तसे शिंगणापूर योजना राबविण्यात आली. प्रामुख्याने या योजनेचा हेतू ई वॉर्डातील नागरिकांना पाणी देण्याचा होता; पण पाण्याची पळवापळवी झाल्याने या हेतूलाच हरताळ फासला गेला. त्यामुळे ई वॉर्डातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाच; शिवाय संपूर्ण शहराचे पाणीवाटप विस्कळीत झाले. पाणी असूनदेखील केवळ मानवी चुका, अनियंत्रित कारभार यांमुळे पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. त्यातून पुढे अधिकाºयांची डोकेदुखी तर वाढणारच आहे; शिवाय नगरसेवकांतसुद्धा भांडणे लागण्याची शक्यता बळावली आहे.
शिंगणापूर जलवाहिनीला फाटे दिले अन्...
शिंगणापूर योजनेची एक मुख्य जलवाहिनी पुईखडी येथून थेट ताराराणी चौकापर्यंत नेण्यात आली आहे. सुमारे अकराशे एम. एम. जाडीच्या या जलवाहिनीवर काही माजकेच फाटे देण्यात आले. आधी ताराराणी चौक येथील पाण्याची टाकी तसेच राजारामपुरी येथील पाण्याची टाकी भरल्यानंतरच या फाट्यावरील व्हॉल्व्ह वळवायचे ठरले होते. कालांतराने या मुख्य जलवाहिनीला आणखी चार ते पाच फाटे देण्यात आले. त्यामुळे अलीकडील नागरिकांना पाणी मिळू लागले. मात्र पुढे पाण्याची कमतरता जाणवू लागली. ‘आधी आमच्या भागाला पाणी मिळाले पाहिजे,’ हा नगरसेवकांचा आग्रह राहिल्याने नियोजन चुकले. परिणामी ताराराणी चौकातील टाकी पूर्ण क्षमतेने भरत नाही. ई वॉर्डातील अपुºया पाण्याचे दुखणे आजही कायम राहिले.
व्हॉल्व्ह ‘सोड-बंद’वरील नियंत्रण सुटले
लहान-मोठ्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह सोड-बंद करण्यावर जर नियंत्रण राहिले तरच पाणीपुरवठा सुरळीत होतो, असा अनुभव आहे; पण बºयाच ठिकाणी नगरसेवक पाणी सोडणाºया कर्मचाºयांना दमबाजी करून, प्रसंगी शिवीगाळ करून आपणाला पाहिजे तसे व्हॉल्व्ह सोड-बंद करायला लावतात. त्यामुळे ज्यांच्या हातांत पाणी सोडण्याची हत्यारे आहेत, त्यांनाच भरपूर पाणी मिळते. बाकीच्या भागातील नागरिकांवर अन्याय होतो.
वेळा चुकल्या, टाक्या भरेनात
एखाद्या भागात पाणी कधी सोडायचे आणि कधी बंद करायचे याचे वेळापत्रक पाणीपुरवठा विभागाने निश्चित केले होते. त्यानुसार लोकांना पाण्याच्या वेळा माहीत होत्या; परंतु अलीकडे पाणी वळवावळवीचे प्रकार घडत असल्याने पुरवठ्याच्या वेळा चुकल्या आहेत. काही ठिकाणी पाण्याची वेळ वाढवून दिली. अनेक ठिकाणी टाक्या पूर्ण क्षमतेने भरण्यापूर्वीच त्यांतून पाणी सोडले जाऊ लागले. त्याचा परिणाम असा झाला आहे की, पाण्याचा दाब पुरेसा मिळत नाही. पाणी काही वेळात जाते; पुरेसे पाणी मिळत नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत.
शिवाजी पेठेत प्रथमच पाणीटंचाई
शिवाजी पेठेत गेल्या अनेक वर्षांपासून नियमित विनातक्रार पाणीपुरवठा सुरू होता; पण गेल्या सहा महिन्यांपासून फिरंगाई तालीम, वेताळ तालीम, सरदार तालीम या परिसरांत पाण्याची टंचाई जाणवत आहे. शिवाजी पेठेच्या वाट्याला येणारे पाणी पुढे पळविले जात असल्याने संध्याकाळी ज्या भागाला पाणी देण्यात येत होते, तेथे आता जेमतेम एक तास अत्यंत कमी दाबाने पाणी मिळत आहे. शिवाजी पेठेत प्रथमच पाणीटंचाई जाणवत आहे.
अधिकारी मात्र नामानिराळे
एकीकडे पाणी पळवापळवी, मर्जीप्रमाणे पाणी सोड-बंद, कर्मचाºयांना होत असलेली शिवीगाळ यांकडे साफ दुर्लक्ष करीत पाणीपुरवठा विभागाकडील वरिष्ठ अधिकारी नामानिराळे झाले आहेत. पाणीपुरवठ्याचे काम आमचे नाहीच, काय भांडायचे ते नगरसेवकच भांडत बसू देत, अशाच भूमिकेत हे अधिकारी आहेत. पाणीपुरवठ्याची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवायची असेल तर योग्य नियोजन करण्याची जबाबदारी अधिकाºयांची आहे. मात्र त्याकडेच त्यांचे दुर्लक्ष झाले आहे.