जॅकवेलच्या कामात व्यत्यय , भराव उपसण्याचे काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:22 AM2021-03-21T04:22:08+5:302021-03-21T04:22:08+5:30
कोल्हापूर : काळम्मावाडी धरण क्षेत्रात जॅकवेलचे काम सुरु असताना शुक्रवारी दुपारी अचानक भराव कोसळल्याने कामात व्यत्यय निर्माण झाला. सुदैवाने ...
कोल्हापूर : काळम्मावाडी धरण क्षेत्रात जॅकवेलचे काम सुरु असताना शुक्रवारी दुपारी अचानक भराव कोसळल्याने कामात व्यत्यय निर्माण झाला. सुदैवाने भराव कोसळण्याआधीच खाली काम करणारे कर्मचारी वर आल्यामुळे दुर्घटना टळली. दरम्यान, शनिवारी सकाळपासून जॅकवेलमधील भराव उपसण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.
कोल्हापूर शहराला शुद्ध पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी थेट पाईललाईन योजना राबविली जात आहे. त्याचे काम आता वेगाने सुरु आहे. जॅकवेलसाठी १५० फूट खाेल खाेदाई करण्यात आली आहे. त्याठिकाणी जॅकवेलचे सिमेंट कॉंक्रिटचे काम हाती घेण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूने जॅकवेलपासून इंटेकवेलपर्यंत खालून जलवाहिनी टाकण्यासाठी खाेदाई केली जात आहे. ही खाेदाई करत असताना शुक्रवारी दुपारी अचानक बाजूचा भराव जॅकवेलसाठी खाेदाई केलेल्या जागेत कोसळला.
मोठ्या प्रमाणावर हा भराव कोसळला असला तरी सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. हा भराव कोसळण्याआधी काही मिनिटे कर्मचारी वर आले होते. जॅकवेलमध्ये उतरण्याकरता तयार केलेला रस्ता या भराव्याखाली अडकला आहे. ही घटना घडल्यानंतर शुक्रवारी हे काम थांबविण्यात आले. शनिवारी मात्र सकाळपासून नियोजन करुन कोसळलेला भराव उपसण्याचे काम सुरु झाले. जादा मशिनरी लावून हे काम केले जाणार आहे. तरीही भराव उपसण्याचे काम आठ दिवस चालेल, असे प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र माळी यांनी सांगितले.
८०० टिपर भराव?
कोसळलेला भराव हा अंदाजे चार हजार एम. क्यू. इतका आहे. एक मोठ्या टिपरमध्ये साधारणपणे पाच एम.क्यू. भराव भरला जातो. त्यामुळे साधारणपणे आठशे टिपर भराव जॅकवेलमध्ये कोसळला आहे.