समानीकरणाच्या जागा दाखवण्यावरून शिक्षकांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:24 AM2021-03-06T04:24:12+5:302021-03-06T04:24:12+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत आज शनिवारी शिक्षक पदावन्नतीचा कार्यक्रम लावण्यात आला आहे. राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात सकाळी १० ते ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत आज शनिवारी शिक्षक पदावन्नतीचा कार्यक्रम लावण्यात आला आहे. राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात सकाळी १० ते ५ यावेळेत होणाऱ्या याप्रक्रियेत ३१९ विषय शिक्षकांची पदावनती होणार आहे. यात समानीकरणाच्या जागा खुल्या करण्याचा निर्णय घेतल्याने काही शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. विशेेष शिरोळ, हातकणंगलेमध्ये या जागा खुल्या करण्यामागे वेगळाच अर्थ दडल्याची चर्चाही आहे.
समानीकरणाच्या शाळा वगळून इतर ठिकाणी आधी पदावनतीची प्रक्रिया पार पडली जाते. पण गेल्या काही दिवसांपासून यात हस्तक्षेप वाढला असून, समानीकरणाच्या जागाही याप्रक्रियेत प्राधान्याने दाखवण्याचे ठरले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनीदेखील याबाबत विचारले असता, कोणत्याही जागा लपविल्या जाणार नाहीत, असे सांगितले आहे.
अशाप्रकारे जागा खुल्या करणे म्हणजे शहरालगतच्या तालुक्यातील आधीच्या शिक्षकांना मुद्दामहून विस्थापित करण्यासारखे आहे, असा शिक्षकांमधील एका गटाचा सूर आहे. दुर्गम डोंगरी तालुक्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्याप्रमाणार रिक्त आहेत. पदावनतीच्या प्रक्रियेत पहिल्यांदा या जागा भरून मग उर्वरित तालुक्यांचा विचार होणे गरजेचे आहे, असाही सूर आहे. पण एकूणच याप्रक्रियेत सध्या राजकीय शिरकाव मोठ्याप्रमाणावर झाला आहे. तसेच काही शिक्षक संघटनांनीही सोयीच्या शाळा पदरात पाडून घेण्यासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा शुक्रवारी जिल्हा परिषदेत सुरू होती.