जाचक नियमामुळेच असंतोष
By Admin | Published: May 4, 2017 10:14 PM2017-05-04T22:14:48+5:302017-05-04T22:14:48+5:30
अभयारण्याला विरोध नाही : नियम लागू झाले तर येथील लोकांना जगणे मुश्कील होण्याची भीती
संजय पारकर --राधानगरी -हे अभयारण्य देशातीलच नव्हे, तर जगातील अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाते. जागतिक वारसास्थळात याचा समावेश झाला आहे. यामुळे राधानगरीची ख्याती सर्वत्र झाली याचा येथील लोकांना अभिमान आहे. अभयारण्य घोषित झाल्यावर वन संपदेत प्रचंड वाढ झाली. बाहेरील लोकांचा येथे ओघ वाढला आहे. त्यामुळे अभयारण्याला लोकांचा विरोध नाही. मात्र, याच्या जाचक नियमांचा फटका बसत असल्याने लोकांमध्ये असंतोष आहे.
राधानगरी एवढे मोठे महत्त्व असलेले अभयारण्य आहे. मात्र, त्याचा पर्यटनस्थळ म्हणून अपेक्षित विकास झालेला नाही. वन्यजीव विभाग वर्षानुवर्षे विकास आराखडा तयार करून पाठवतो. कोट्यवधीची मागणी होते. मात्र, तुटपुंजा निधी मिळतो. त्यामुळे काहीच काम होत नाही. अभयारण्याला जोडून असलेली तीन मोठी धरणे, काही पर्यटनस्थळे विकसित झाली तर हा व्यवसाय वाढून अनेकांना रोजगार मिळू शकतो. कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, गोवा या राज्यांत अशी ठिकाणे मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहेत. त्याचा स्थानिकांना मोठा फायदा होतो. त्यामुळे लोकच यासाठी पुढे येतात अशी तेथे स्थिती आहे.
तसे चित्र येथे दिसत नाही.
याउलट वन्यजीव विभागाच्या जाचक निर्बंधामुळे अनेक प्रकल्प रखडले आहेत. त्याचा विकासावर विपरीत परिणाम झाला आहे. दहा वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या १२ व्या वित्त आयोगाकडून राज्याला मिळालेल्या निधीतून दाजीपूर येथील पर्यटन महामंडळाच्या निवासस्थानाच्या विकासासाठी पाच कोटी रुपये मिळाले होते. या कामाचे तत्कालीन मंत्र्यांनी उद्घाटन केले, पण वन्यजीव विभागाने त्यात खोडा घातल्याने ते रद्द झाले. राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा ता तीन तालुक्यांना वरदान ठरणारा धामणी धरण प्रकल्प वन्यजीव विभागाच्या आडकाठीमुळे रेंगाळला आहे. त्याची झळ लोक सहन करत आहेत. परिसरातील कामतेवाडी, बनाचीवाडी, फेजिवडे हे लघु प्रकल्प रखडल्याने मोठ्या प्रमाणात शेती कोरडवाहू राहिली आहे.
वाकीघोलात जाणारा रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जातो. तेथे डांबरीकरण व अन्य काम करण्यास मनाई आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्ता बंद होतो. परिणामी या भागाचा चार महिने संपर्क तुटतो. त्यावेळी त्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. राधानगरी ते गगनबावडा यांना जोडणाऱ्या रस्त्यात केवळ दीड किलोमीटरचे अंतर आहे. मात्र, वन हद्दीमुळे हा रस्ता पक्का होण्यास अडथळा होत आहे.
वन्यप्राण्यांकडून होणारा त्रास न सांगण्यासारखा आहे. आतापर्यंत हत्तीने दोन बळी घेतले आहेत. गव्यांनी यापेक्षा जास्त बळी घेतले आहेत. यामुळे मरण पावणाऱ्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. मध्यंतरी सध्याच्या अभयारण्यात राधानगरी, भुदरगड व गगनबावडा तालुक्यांतील १४ गावे समाविष्ट करून याचे क्षेत्रफळ आणखी ८५ चौरस किमीने वाढवून ते ४३६.१६ किमी करण्याचा विचार चालू होता. हा प्रस्ताव केव्हाही डोके वर काढू शकतो.
यासंदर्भात झालेल्या एका बैठकीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सध्या वन विभाग केवळ दहा टक्के नियमांची सक्ती करतो, असे सांगितले होते. म्हणजे पूर्ण नियम लागू झाले तर येथील लोकांना जगणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनाबरोबर आम्हाला माणूस म्हणून जगण्याची सोय करा, एवढीच मागणी या लोकांची आहे.