सोयीच्या राजकारणाचेच ‘धर्मसंकट’

By admin | Published: September 14, 2015 12:20 AM2015-09-14T00:20:14+5:302015-09-14T00:21:25+5:30

राष्ट्रवादीला गटबाजीचे ग्रहण: प्रत्येक निवडणुकीत नेत्यांची नवी सोयरिक; कार्यकर्त्यांतही संभ्रम

Dissatisfaction with friendly politics | सोयीच्या राजकारणाचेच ‘धर्मसंकट’

सोयीच्या राजकारणाचेच ‘धर्मसंकट’

Next

विश्वास पाटील कोल्हापूर
कौटुंबिक धर्मसंकट असल्याचे कारण सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक हे महापालिकेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे नेते म्हणून रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचे पाठबळ ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या मागे असेल. विधानसभेपाठोपाठ महापालिका निवडणुकीतही महाडिक यांचे ‘धर्मसंकट’ सोयीच्या राजकारणाचे उत्तम उदाहरण आहे. पक्षही आमदार हसन मुश्रीफ व खासदार महाडिक यांच्यात दुभंगला आहे. या दोन नेत्यांत वरकरणी सौहार्दाचे संबंध असले तरी प्रत्यक्षात संघटनेत मात्र दरी वाढल्याचे दिसते. असेच धर्मसंकट मुश्रीफ यांच्यासमोर गोकुळ व बाजार समितीच्या निवडणूकीत आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मध्यंतरी महापालिका निवडणुकांसाठी दोन दिवस इच्छुकांच्या मुलाखती झाल्या; परंतु त्याकडे महाडिक फिरकले नाहीत. खरे तर पक्षाचे एकमेव खासदार असलेल्या महाडिक यांची या निवडणुकीतील जबाबदारी जास्त होती. मात्र सध्या तरी राष्ट्रवादी त्यांच्या अजेंड्यावर नाही. त्याऐवजी ताराराणी आघाडी व पर्यायाने भाजपच्या राजकारणास बळकटी येईल, अशी भूमिका त्यांची आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी आमदार महादेवराव महाडिक यांची संमती नसतानाही माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी महाडिक यांनी जुळवून घेतले; परंतु पुढे विधानसभा निवडणुकीवेळी मात्र त्यांनी असेच धर्मसंकटाचे कारण पुढे करून कोल्हापूर दक्षिण मतदार संघात भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांना मदत केली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पक्षाचे अधिकृत उमेदवार आर. के. पोवार यांनाही त्यांनी धर्मसंकटाचे कारण सांगत मदत केली नाही. आता तोच कित्ता ते महापालिका निवडणुकीत गिरवत आहेत. पहिल्या दोन अनुभवांमध्ये प्रश्न व्यक्तींचा होता; परंतु आता मात्र तो पक्षीय बांधीलकीचा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिवंगत नेते खासदार सदाशिवराव मंडलिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्यात वर्चस्वाचा वाद झाला. त्यामध्ये नेतृत्वाने मुश्रीफ यांना बळ दिल्याने मंडलिक पक्षातून बाहेर पडले. मंडलिक यांच्यानंतर धनंजय महाडिक यांना लोकसभेची उमेदवारी दिली. देशात दोन्ही काँग्रेसविरोधात लाट असताना ती थोपवून ते निवडून आले. त्यात त्यांचा व्यक्तिगत करिष्मा, महाडिक गट म्हणून असलेली ताकद या महत्त्वाच्या बाबी होत्या हे खरे असले तरी ‘राष्ट्रवादी’ची उमेदवारी व दोन्ही काँग्रेसची एकसंधपणे झालेली मदत त्यांना गुलाल लावून गेली, हेदेखील तितकेच खरे आहे. आता मुश्रीफ व महाडिक हे राष्ट्रवादीचे नेते असले तरी पक्ष म्हणून बहुतांश संघटना मुश्रीफ यांच्यामागे आहे. याउलट महाडिक यांचे सगळे कार्यक्रम व्यक्तिगत महाडिक गट म्हणजे युवाशक्तीच्या माध्यमातून होत आहेत. गेल्याच आठवड्यातील त्यांचा पाच हजार महिलांना विमा कवच देण्याचा कार्यक्रम असो किंवा दहीहंडीचा कार्यक्रम असो; तिथे राष्ट्रवादी पक्ष म्हणून कुठेच चित्रात नव्हती.
जिल्हयाच्या राजकारणात मुश्रीफ व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे व तेच चंद्रकांतदादा, खासदार महाडिक यांच्यासमवेत दहीहंडीच्या उपक्रमास उपस्थित राहतात, ही विसंगती मुश्रीफ-महाडिक यांच्यातील दरी स्पष्ट करणारी आहे. मुश्रीफ यांचा चंद्रकांतदादांवर टीकेचा भडिमार सुरु होण्यामागेही हे राष्ट्रवादीतील कुरघोडीचे राजकारण कारणीभूत आहे. भले मुश्रीफ व महाडिक हे दोघेही कितीही नकार देत असले तरी राष्ट्रवादीत त्यांच्या स्वतंत्र सुभेदाऱ्या तयार झाल्या आहेत. महापालिका निवडणुकीतील राजकीय भूमिकेस पक्षनेतृत्वानेच परवानगी दिली असल्याचे महाडिक यांच्याकडून सांगण्यात येते. ते खरे असेल तर ती नेतृत्वाचीही अगतिकताच म्हटली पाहिजे.
महाडिकच केवळ पक्षाचा सोयीने वापर करतात असेही नाही. गोकुळ व बाजार समितीतील मुश्रीफ यांचे राजकारण हे पक्षापेक्षा स्वत:चे राजकारण बळकट करणारेच होते. आताही राष्ट्रवादी म्हणजे मुश्रीफ, के.पी. व ए. वाय. या तिघांची पार्टी अशी टीका उघडपणे होवू लागली आहे. श्रीमती माने, राजेंद्र पाटील यड्रावकर, मानसिंगराव गायकवाड, पी. जी. शिंदे, अरुण इंगवले आदी नेते राष्ट्रवादीत नामधारी असून अस्वस्थ आहेत.
महाडिक यांचे राजकीय गणित
पक्षात राहूनही वेगळी भूमिका घेण्यामागे खासदार महाडिक यांचे काही राजकीय गणित नक्कीच आहे. देशाच्या व राज्याच्या राजकारणातही येती काही वर्षे भाजपचा वरचष्मा राहील, असे महाडिक गटाला वाटते. त्यामुळे त्याच पक्षाची भविष्यातही संगत करण्याचा या गटाचा प्रयत्न दिसतो.
अमल महाडिक यांना विधानसभा निवडणुकीला राजकीय मदत व्हावी यासाठी कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपच्या चिन्हावर लढायचे व आमदार महादेवराव महाडिक यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत रसद मिळावी म्हणून ‘ताराराणी’चे नगरसेवक कसे जास्तीत जास्त निवडून येतील, असे प्रयत्न करायचे असे हे दुहेरी राजकारण आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीची ताकद लक्षणीय आहे. तो पक्ष विधान परिषदेच्या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेतो यालाही महत्त्व आहे; परंतु महाडिक गटाच्या महापालिका निवडणुकीतील सगळ्या जोडण्या या त्या निवडणुकीतील गणिते जुळविणाऱ्या आहेत.
गट म्हणून ताकद
लोकसभेला निवडून येण्यासाठी राष्ट्रवादीची मदत झाली असली तरी महाडिक गट म्हणून आपली ताकद मजबूत असल्याचे खासदारांना वाटते.
शिवाय सध्या जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना कुणी लोकसभेसाठी स्पर्धक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाडिक गटामागे काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप या तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांची फरफट होत असल्याचे सध्याचे चित्र दिसते आहे.

Web Title: Dissatisfaction with friendly politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.