‘मानवी साखळी’तून व्यसनमुक्तीचा संदेश

By admin | Published: January 6, 2017 12:41 AM2017-01-06T00:41:52+5:302017-01-06T00:41:52+5:30

जनस्वास्थ्य अभियान : जिल्ह्यातील ८५० शाळांचा समावेश; घोषणांतून प्रबोधन

Dissemination message from 'Human chain' | ‘मानवी साखळी’तून व्यसनमुक्तीचा संदेश

‘मानवी साखळी’तून व्यसनमुक्तीचा संदेश

Next

कोल्हापूर : ‘एकच प्याला त्याचा अखेर झाला’, ‘व्यसनाला नकार जीवनाला होकार’, ‘दारूत रंगला संसारात भंगला’, ‘तंबाखूचा झटका कॅन्सरचा फटका’, अशा विविध घोषणा देत मानवी साखळीतून गुरुवारी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
जनस्वास्थ्य दक्षता समिती, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यातर्फे रविवार (दि. १)पासून जिल्ह्णात जनस्वास्थ अभियान राबविण्यात आले. अभियानाच्या समारोपप्रसंगी जनस्वास्थ्य दक्षता समितीचे अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकात मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. दसरा चौकासह शहरात माऊली चौक, रंकाळा परिसरात झालेल्या या मानवी साखळीत साठहून अधिक शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जिल्हाभरात ८५० शाळांमध्ये प्रमुख रस्त्यांवर व्यसनांविरोधी पोस्टर व घोषणा देत मानवी साखळीतून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
अभियान काळात विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध विषयांवरील सामाजिक संदेश देणारे पोस्टर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यामध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढावो’, ‘सेव्ह ट्री, सेव्ह अर्थ’, ‘स्वच्छ परिसर, सुंदर परिसर’, ‘पर्यावरण वाचवा अशा विषयांवरील पोर्स्टसचा समावेश होता.
यावेळी देवलापूरकर म्हणाले, पर्यावरण प्रदूषणामुळे निर्माण झालेले प्रश्न, हवामानातील बदल, गंभीर आजारांबाबत दक्षतेचे अज्ञान, गुटखा, तंबाखू, धूम्रपान, दारू आणि अमली पदार्थ यांची व्यसनाधीनता, लैंगिक शिक्षणाअभावी तरुण वयात होणाऱ्या चुका, आदी समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाभर जनस्वास्थ्य अभियान राबविण्यात आले. सोळा वर्षांपासून हे अभियान सुरू आहे. समाजाला चांगल्या गोष्टींची जाणीव व्हावी, व्यसनांबाबत मुलांमध्ये प्रबोधन व्हावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
अभियान काळात स्वच्छता अभियान, कचऱ्यापासून खत निर्मिती, फळझाडे लागवड, टेरेसवरील भाजीपाला लागवड, सांडपाण्याचा पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंगची कृती घरी करावी, याबाबत प्रबोधन, किशोरवयीय लैंगिक समस्यांबाबत मार्गदर्शन, कुष्ठरोग, क्षयरोग, एड्स, कीटकजन्य आजारांबद्दल मार्गदर्शन, आदी उपक्रम राबविण्यात आले. मानवी साखळीचे नियोजन बृहस्पती शिंदे, पुष्पराज माने, मिनार देवलापूरकर, व्ही. बी. चौगुले, एस. एस. पाटील, मनोज आलमाने, बी. एच. पाटील, एस. बी. पाटील, समीर कुलकर्णी, ओंकार पाटील यांनी केले.

Web Title: Dissemination message from 'Human chain'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.