जि. प. च्या सत्तासंघर्षात महादेवराव महाडिकांची ‘एंट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 12:27 AM2019-12-25T00:27:27+5:302019-12-25T00:28:04+5:30
गेले १५ दिवस जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षाने वेग घेतला आहे. सुरुवातीला आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार पी. एन. पाटील यांनी जिल्हा बॅँकेत कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक घेतली आणि जिल्हा परिषदेत सत्तांतर घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षामध्ये ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक यांनी ‘एंट्री’ केली असून, पुन्हा एकदा सत्ता राखण्यासाठी ते सक्रिय झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ‘जनसुराज्य’चे संस्थापक आमदार विनय कोरे यांच्याशी महाडिक यांनी मंगळवारी दुपारी एका ठिकाणी चर्चा केली.
गेले १५ दिवस जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षाने वेग घेतला आहे. सुरुवातीला आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार पी. एन. पाटील यांनी जिल्हा बॅँकेत कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक घेतली आणि जिल्हा परिषदेत सत्तांतर घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर लगेचच दोन दिवसांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेतील मित्रपक्षांशी आणि काही सदस्यांशी चर्चा केली. यानंतर दोन्ही कॉँग्रेसच्या सदस्यांना सोमवारी, एकत्र करत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी आपल्या सदस्यांना पक्षाचा व्हिप बजावला आहे.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी एका हॉटेलवर चंद्रकांत पाटील, महादेवराव महाडिक, विनय कोरे, माजी खासदार धनंजय महाडिक, ‘जनसुराज्य’च्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यामध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली.
जिल्हा परिषदेत ४० सदस्यांसह सत्तेत असलेल्या भाजपला पहिला धक्का अपक्ष सदस्य रसिका पाटील यांनी दिला आहे. त्यानंतर राजू शेट्टी यांनी साथ सोडली आहे आणि विजय भोजे यांना मतदानाच्या अधिकाराबाबत साशंकता आहे. या पार्श्वभूमीवर भाजप मित्रपक्षांचे बळ ३६ वर आल्याने नेत्यांनी उर्वरित सदस्यांना सोबत ठेवण्यासाठी प्रामुख्याने चर्चा केल्याचे समजते.
या ३६ सदस्यांपैकी एकही सदस्य बाजूला जाणे हे भाजप आणि मित्रपक्षांना परवडणारे नाही. त्यामुळे या बैठकीमध्ये याबाबत सदस्यांच्या नावांनिशी आढावा घेण्यात आला असून आहे ते सदस्य सोबत ठेवण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सदस्यांना सहलीवर पाठविण्याचेही निश्चित करण्यात आले.
- पी. एन., सतेज मुंबई, दिल्लीत
अजून मंत्रिमंडळ विस्तार व्हायचा असल्याने
पी. एन. पाटील आणि सतेज पाटील हे दोन्ही कॉँग्रेसचे नेते मुंबई, दिल्लीत आहेत. त्यामुळे त्यांचे समर्थक नेते, कार्यकर्तेच सध्या धावपळीत दिसत आहे. आज, बुधवारी हे दोन्ही नेते कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारी दोन्ही कॉँग्रेसचे सदस्य सहलीवर जाणार आहेत.
- शिवसेना नेत्यांची होणार बैठक
शिवसेनेच्या दहा सदस्यांपैकी सात सदस्य सध्या सत्तारूढ भाजपसोबत आहेत. त्यामुळे या सर्वांनी एकत्रित भूमिका घ्यावी, यासाठी प्रा. संजय मंडलिक यांच्या पुढाकारातून शिवसेना नेत्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.