जि. प. पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी ऑनलाइन प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:28 AM2021-09-24T04:28:36+5:302021-09-24T04:28:36+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येणार ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी झालेल्या मासिक बैठकीत देण्यात आली. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीतून विशेष घटकच्या योजना घेण्यात येतात. कोल्हापूर जिल्हा परिषदेने दोन गायी, दोन म्हशी ही ७५ टक्के अनुदानाची योजना अनुसूचित जाती-जमातीसाठी जाहीर केली आहे. दुसरी १० शेळ्या आणि १ बोकडाची योजना असून या योजनेलाही ७५ टक्के अनुदान आहे. या दोन्ही योजनांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अर्ज सादर करण्याबाबत पुढची प्रक्रिया अजून कळवण्यात आलेली नाही, असे यावेळी विभागाचे उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. विनोद पवार यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या निधीतून सर्वसाधारण गटातील घटकांसाठी पोल्ट्री, शेळी-मेंढी आणि वराह पालनासाठीही अनुदान देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या योजनांसाठी लवकरात लवकर प्रस्ताव मागवून अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ देण्याची सूचना जयवंतराव शिंपी यांनी केली. यावेळी पन्हाळा सभापती वैशाली पाटील, कागल सभापती रमेश तोडकर, हातकणंगले सभापती प्रदीप पाटील, सदस्या वंदना पाटील उपस्थित होत्या.