डिस्टिलरी प्रकल्प, रोजंदारीत बोगसगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:55 PM2017-10-01T23:55:47+5:302017-10-01T23:55:47+5:30
बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सह. साखर कारखाना निवडणूक संदर्भात राजर्षी शाहू आघाडीचे प्रमुख आमदार प्रकाश आबिटकर यांनी विरोधकांच्या खोटे बोल, पण रेटून बोल या प्रवृत्तीचा खरपूस समाचार घेत विरोधी आघाडीवर विविध आरोप करीत हल्लाबोल केला. यामध्ये को-जनरेशनचा आॅडिट रिपोर्ट खोटा आहे, डिस्टिलरी प्रकल्पातील बोगसगिरी, रोजंदारीत बोगसगिरी, लई भारी म्हणत इतर भागातील आप्तेष्टांना या भागातील रहिवासी दाखवत केलेले बोगस सभासद, वाहनांच्या आगाऊ (अॅडव्हान्स) रकमेतील बोगसगिरीकडे लक्ष वेधत चौफेर हल्ला चढविला. आघाडी प्रमुख म्हणून त्यांनी अनेक मुद्द्यांवर मुद्देसूद विवेचन केले. सत्ताधारी आघाडी शेतकºयांना कसे फसवत आहेत याचा पाढाच त्यांनी वाचून दाखविला.
प्रश्न : या निवडणुकीत आपल्या आघाडीची (पॅनेलची) रचना कशी काय आहे?
उत्तर : आम्हाला आमच्या गटातील ज्येष्ठ व इच्छुक उमेदवारांनी मोठ्या मनाने माघार घेतली आणि योग्य व तुल्यबळ उमेदवारांना संधी दिल्याने विरोधी आघाडीतील उमेदवारांपेक्षा सक्षम पॅनेल उभा करण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. हे सर्व उमेदवार सर्वसामान्य लोकांतील असल्यामुळे विजय हा आमच्या आघाडीचाच आहे.
प्रश्न : या निवडणुकीला सामोरे जाताना तुमच्याकडे कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत?
उत्तर : गेली पाच ते सात वर्षे आम्ही माजी आमदार के. पी. पाटील यांच्या भ्रष्टाचाराविरोधात लढाई देत आहोत. या लढाईला आता अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्यावेळी त्यांचे उमेदवार पाच हजार मताधिक्क्याने निवडून आले होते; पण यावेळी त्यांना भाजपला सोबत घ्यावे लागले आहे. स्वच्छ कारभाराचा डंका पिटणाºया या अध्यक्षांना पराभवाच्या भीतीने उमेदवार आयात करावे लागले आहेत. तोडणी कार्यक्रमात बट्ट्याबोळ आणि स्वकियांसाठी इतरांना वेठीस धरल्याने सर्वसामान्य कार्यकर्ते आणि प्रामाणिक ऊस उत्पादक शेतकरी दुरावले आहेत. याशिवाय आम्ही उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपये दर, सभासदांना पाच हजार रुपये बोनस देण्यास वचनबद्ध आहोत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना उमेदवार आयात करावे लागले आहेत.
प्रश्न : सभासदांनी तुमच्या आघाडीतील उमेदवारांना का निवडून द्यावे?
उत्तर : आम्ही ऊस तोडणी कार्यक्रम अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून करणार आहोत. यामध्ये आपले कार्यकर्ते, पै-पाहुणे अशी उतरंड न लावता नोंदणीप्रमाणेच ऊस तोडणी कार्यक्रम करणार. बोगस सभासद यांची उचलेगिरी बंद करून प्रामाणिकता असणाºयांना प्राधान्य दिले जाईल. गाळप क्षमता प्रतिदिन पाच हजारांवरून साडेसात हजार मेट्रिक टनांपर्यंत करणार, जेणेकरून परिसरातील सर्व ऊस इथेच गाळला जाईल. डिस्टिलरी आणि इतर प्रोजेक्ट उभारून उत्पादक शेतकºयाला जास्तीत जास्त दर देण्यासाठी आग्रही राहणार आहे. माती परीक्षण आणि एकरी उत्पन्नवाढीसाठी विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. कारखान्याच्या महाविद्यालयात शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना माफक खर्चात आयटीआय, इंजिनिअरिंग यासारख्या शैक्षणिक शाखा सुरू करणार आहे. उशिरा येणाºया उसाला सानुग्रह अनुदान देण्यात येऊन, कारखाना कार्यक्षेत्रातील पाणंद रस्ते दुरुस्त व मजबूत करणार आहे. मातीपरीक्षण करून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविणार, असे सभासदांच्या आर्थिक उन्नतीचे प्रभावी मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात असल्याने सर्व सभासद आमच्या आघाडीसोबतच आहेत.
प्रश्न : भाजपच्या युतीचा आपल्या आघाडीवर काय परिणाम होईल?
उत्तर : राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत युती केल्याने आमची आघाडी विजयी होणार याची खात्री झाली आहे. शेतकºयांची ‘अच्छे दिना’ची हौस आणि कर्जमाफी देण्यात लावलेले निकष यामुळे शेतकºयांना जगणे मुश्कील केले आहे. त्याचा वचपा आता शेतकरी काढल्याशिवाय राहणार नाहीत. इथला शेतकरी हा स्वाभिमानी असल्यामुळे तो भूलथापांना बळी पडणार नाही. याशिवाय या दोन्ही पक्षांनी सच्च्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलून त्यांना प्रामाणिकपणाची चांगलीच शिक्षा दिली आहे. असे सर्व नेते आणि कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. जीवन पाटील यांच्यासारख्या सच्चा नेत्याने आपल्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे. यातून त्यांना उत्तर मिळाले आहे. विरोधी आघाडीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पराभवाच्या भीतीने ग्रासलेले नेते विजयासाठी जिवाच्या आकांताने खोटेनाटे सांगत सैरभैर पळत सुटले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीने आम्ही विजयी होणार असल्याची खात्री पटली आहे.
प्रश्न : नाराज इच्छुकांनी कोणती भूमिका घेतली आहे ?
उत्तर : मुळात माजी आमदार के. पी. पाटील यांच्या भ्रष्टाचाराचे आणि पै-पाहुण्यांच्या सोबतीच्या राजकारणाला इथली जनता आणि कार्यकर्ते कंटाळलेले आहेत. गावागावांत राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत दोन-दोन, चार-चार गट आहेत. फोडा आणि झोडा या नीतीला सर्व लोक कंटाळले आहेत. आम्ही अंतर्गत गटबाजीपेक्षा कार्यकर्ते उभा करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यामुळेच आमच्यातील इच्छुक नाराज झाले नाहीत. कारण ते सत्तेसाठी नव्हे, तर विचाराने एकत्र आले आहेत. जिथे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकासासाठी राजकारण केले जाते, तिथे नाराज होत नाहीत. आमच्यात कोणीही नाराज न झाल्याने विरोधकांनी खोट्या बातम्या व्हॉट्सअॅप करून सभासदांत संभ्रमावस्था निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.
-शिवाजी सावंत