लग्न समारंभातील रीतीरिवाज, पध्दतींचे विद्रूपीकरण; हळदीच्या कार्यक्रमात शॉवर, साऊंड सिस्टिम लावून धिंगाणा

By विश्वास पाटील | Published: June 5, 2023 11:47 AM2023-06-05T11:47:31+5:302023-06-05T11:48:16+5:30

गाभा हरवला आणि उत्सवीकरणाला महत्त्व आले

Distortion of wedding customs and practices | लग्न समारंभातील रीतीरिवाज, पध्दतींचे विद्रूपीकरण; हळदीच्या कार्यक्रमात शॉवर, साऊंड सिस्टिम लावून धिंगाणा

लग्न समारंभातील रीतीरिवाज, पध्दतींचे विद्रूपीकरण; हळदीच्या कार्यक्रमात शॉवर, साऊंड सिस्टिम लावून धिंगाणा

googlenewsNext

विश्वास पाटील (लेखक लोकमत कोल्हापूरचे उपवृत्त संपादक आहेत)

परंपरेने चालत आलेल्या व अत्यंत विचारपूर्वक सुरू केलेल्या अनेक चांगल्या रीतीरिवाज, पध्दतींचे विकृतीकरण झाले की त्याचे काय होते याचा अनुभव आपण आताच्या लग्न समारंभातील अनेक पध्दतीमध्ये घेत आहोत. मूळ तो रिवाज का सुरू झाला, त्यामागील भावना, पावित्र्य काय होते याचा विचार न करताच त्याचे अवडंबर माजवण्याची वाईट स्पर्धा समाजाला लागली आहे. त्यात तुम्ही हे करताय ते चुकीचे आहे असे त्यांना कोण सांगतही नाही आणि ते चुकीचे आहे असेही समाजाला वाटत नाही. तसे वाटत असते तर अशा काही पध्दती कमी किंवा बंद झाल्या असत्या. प्रत्यक्षात तसे न होता त्या अधिक भडकपणे साजऱ्या करून आनंद मिळवण्याची समाजात जणू स्पर्धाच लागली आहे. प्रत्येकजण जे सुरू आहे त्याच्या पुढे एक पाऊल टाकत आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा (ता.करवीर) येथे गेल्या आठवड्यात हळदीच्या समारंभात शॉवरच्या लोखंडी खांबामध्ये विजेचा प्रवाह सुरू झाल्याने एका कष्टातून आयुष्य उभे केलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. त्याला दोन लहान मुली आहेत. चार महिन्याची मुलगी आहे. सारे कुटुंब त्याच्यावर अवलंबून होते. परंतु एक शॉक त्या कुटुंबाचे जगणे उद्ध्वस्त करणारा ठरला. पाहुण्याच्या लग्नातील हळद त्याच्या जीवावर बेतली. 

हल्ली लग्न, गावातील असो की शहरातील. हळदी लावण्याच्या कार्यक्रमात शॉवर, साऊंड सिस्टिम आणि मद्यपान करून धिंगाणा हे सुत्रच घट्टच झाले आहे. या शॉवरसाठी किमान तीन हजारांपासून पैसे मोजायला लागतात. त्याशिवाय हळद लावणारे पाहुणे किती आहेत त्यावर पाच किंवा दहा हजार लिटर पाण्याची व्यवस्था करावी लागते. पाण्याची नासाडीचा विचार करणाऱ्याला खुळ्यातच काढले जाते. पोरांच्या हौसेपुढे असल्या फालतू गोष्टींचा विचार करणारा मागासलेल्या मनोवृत्तीचा किंवा मुलांचा चांगलं बघवत नाही असा ठरतो. 

लग्नाच्या आदल्या दिवशी किमान तीन तास हा धिंगाणा सुरू असतो. त्यात हळद वाटीभरच असते आणि उधळली जाते ती पिवडीच असते. ती लावल्याने नव्हे अंगावर ओतल्याने केस आणि चेहराही विद्रूप होऊन जातो. डोळे चरचरतात. कागल तालुक्यात मागच्या पंधरवड्यात दोन घटना अशा घडल्या की नवरीकडील एकाच्या अंगावर ही पिवडी कुणीतरी टाकली. त्यातून वाद झाला. तो मिटवताना दोन्ही बाजूकडील कुटुंबियांना फेस आलाच आणि नव्या नात्यातही कटूता तयार झाली. अशा वादातून हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. लग्न मोडण्यापर्यंत प्रकार घडले आहेत. 

एका अर्थाने आपल्या लग्नसमारंभातील एका चांगल्या रिवाजाचेच समाजाने केलेले हे विद्रूपीकरण आहे. घरदार,कपडे, शरीर आणि मनही घाण होण्यापलिकडे यातून हाती कांहीच लागत नाही. काही ठिकाणी तरी लोक बादलीने ही पिवडी एकमेकांच्या अंगावर ओततात. पाटणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जेसीबीतून फुले उधळली तशी किंवा अनेकदा गुलालही उधळला जातो तसा आता एखादा बहाद्दर ही पिवडी कालवून ती जेसीबीने अंगावर ओतायलाही मागे पुढे पाहणार नाही. समाज एवढा बेभान झाला आहे. 

मुळात नवरा-नवरीला हळद लावण्यामागील भावना आरोग्याशी जोडलेली आहे. हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून स्वयंपाक घरापासून आपल्या सर्वच धार्मिक कार्यात केला गेला आहे. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो, ती जंतुनाशक आहे. म्हणूनच ती लग्नापूर्वी लावली जाते. त्यामागेही दोन कारणे आहेत. दोन भिन्न कुटुंबातील व्यक्ती एकत्र येताना त्यांना परस्परांपासून कोणताच संसर्ग होऊ नये हा त्यातील मुख्य गाभा. त्यांची सुरक्षितता म्हणून हळद लावायची. दुसरे असे की आपल्या संस्कृतीनेच असे रिवाज आपल्या सामाजिक जीवनात पेरले आहेत की त्यातून नात्याची वीण अधिकाधिक घट्ट व्हावी. 

पूर्वी हळद लावण्यापूर्वी हळद दळण्याचा कार्यक्रम होत असे. भल्या मोठ्या लाकडी जात्यात ती हळकुंडे दळायची. त्याला साऱ्या भावकीला बोलवले जाई. दळलेली हळद अगोदर ज्यांच्या नावचे देवक आहे त्यांना लावली जाई. मग ती नवऱ्याला लावायची. त्यासाठी भिजवलेली उष्टी हळद नवरीच्या गावाला वाटीतून पाठवून दिली जाई. ही हळद आल्याशिवाय नवरीला परस्पर हळद लावली जात नसे. आपल्या ताटातले अर्धे होणाऱ्या पत्नीसाठी काढून देण्याची भावना म्हणजे तिला मनापासून स्वीकारले हा कृतीतून दिलेला विश्वास असे. दोघांना एकत्र आणणारा हा एक संस्कारच आहे.

अक्षतापूर्वी नवऱ्यास बैलगाडी, सायकल, घोडा, किंवा मोटारीतून श्रीबंधनाला नेले जाते. मुख्यत: ग्रामदैवताला जाऊन नमस्कार केला जातो. नवीन आयुष्याची (मुख्यत: प्रजननास परवानगी) सुरुवात करताना गावपांढरीची सावली आपल्यावर असावी असा त्यामागे हेतू. देवाची परवानगी घेण्याची प्रथा. अशा अनेक प्रथा-परंपरा, रिवाज समाजव्यवस्थेने नातेसंबंध अधिक घट्ट व्हावेत या हेतूने सुरू केल्या. त्यातला गाभा हरवला आणि उत्सवीकरणाला महत्त्व आले.

Web Title: Distortion of wedding customs and practices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.