आत्मनिर्भर योजनेंतर्गत तीन हजार पथविक्रेत्यांना कर्ज वितरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:17 AM2021-01-01T04:17:14+5:302021-01-01T04:17:14+5:30
कोल्हापूर : पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना दहा हजार रुपयांचा पतपुरवठा करण्यात येत असून, अर्ज केलेल्या ६ हजार ...
कोल्हापूर : पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना दहा हजार रुपयांचा पतपुरवठा करण्यात येत असून, अर्ज केलेल्या ६ हजार ६१० पथविक्रेत्यांपैकी आतापर्यंत २ हजार ९९४ पथविक्रेत्यांच्या प्रकरणांना मंजुरी देत कर्ज वितरीत करण्यात आल्याची माहिती महापालिका सुत्रांनी गुरुवारी दिली.
शहरातील बँकांनी जवळपास १ हजार २७६ जणांचे कर्ज मंजूर केले आहे. परंतु, हे कर्ज वितरीत केलेले नाही. ज्या फेरीवाल्यांना कर्ज मिळालेले नाही, त्या फेरीवाल्यांनी त्यांनी ज्या बँकेत पीएम स्वनिधी योजनेचा लाभ मिळण्याबाबत ऑनलाईन अर्ज केला आहे, त्या बँकेत शनिवारी (दि. २ जानेवारी) सर्व कागदपत्र सादर करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपआयुक्त निखील मोरे यांनी केले.
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना महापालिका क्षेत्रात अधिक वेगाने राबवून महानगरपालिका राज्यात आघाडीवर ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. महापालिकेच्या या प्रयत्नांना शहरातील सर्व बँकानी कर्जप्रकरणे मंजूर करुन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.