खुल्या मार्केटमधील परवानगी विरोधात वितरकांचा व्यापार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:24 AM2021-08-29T04:24:00+5:302021-08-29T04:24:00+5:30
कोल्हापूर : हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने जिओ मार्टला खुल्या मार्केटसाठी दिलेल्या परवानगीमुळे राज्यातील २० हजारांवर अधिकृत वितरक आणि त्यांच्यावर अवलंबून ...
कोल्हापूर : हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने जिओ मार्टला खुल्या मार्केटसाठी दिलेल्या परवानगीमुळे राज्यातील २० हजारांवर अधिकृत वितरक आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे तीन लाखांच्यावर कामगार यांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी ऑल इंडिया कन्झ्युमर प्रॉडक्टस् डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनच्या वतीने शनिवारी व्यापार बंद आंदोलन करण्यात आले.
यानिमित्त चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात झालेल्या बैठकीत फेडरेशनचे अध्यक्ष धैर्यशील पाटील म्हणाले, या निर्णयामुळे लाखो छोट्या व्यावसायिकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. वितरक लाखो, करोडोंची पुंजी लावून कंपन्यांसाठी सेवा देतात आणि त्या मोबदल्यात कंपन्या त्यांना देशोधडीला लावण्याचे काम करत असतील तर हे अन्यायकारक आहे. कंपन्या मॉडर्न ट्रेडच्या नावाखाली मॉल्स आणि ई कॉमर्स कंपन्यांना भरघोस डिस्काउंट देतात आणि वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या वितरकाला कमी कमिशन देतात. एकाच मार्केटमध्ये एकाच उत्पादनाचा दर वेगवेगळा असल्याने वितरकाचे नुकसान होत आहे. आज एफएमसीजीचे महसुलात मोठे योगदान असताना शासनाने त्यांच्या व्यापाराचे संरक्षण करावे. शासनाने या बाबतीत लक्ष घालून एका वस्तूचे सर्व ठिकाणी एकच दर असतील व त्यामध्ये तफावत असणार नाही याची दक्षता घ्यावी. आमच्या मागण्या शासनाला कळाव्यात यासाठी आजचा हा बंद आम्ही महाराष्ट्रभर पाळत आहाेत.
यावेळी सर्व वितरकांनी व्यवसाय बंद ठेवून व दंडावर काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. कोल्हापूर कन्झ्युमर प्रोडक्टस् डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे अध्यक्ष व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक प्रशांत शिंदे, महाराष्ट्र फेडरेशनचे खजानिस अतुल दोशी, झोन अध्यक्ष विजय नारायणपुरे, हिंदुस्थान युनिलिव्हरच्या वितरक निकिता पाटील व वितरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
फोटो नं २८०८२०२१-कोल-कंझ्युमर फेडरेशन
ओळ : कोल्हापुरात शनिवारी ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोडक्टस् डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनच्या वतीने जिओ मार्टला खुल्या मार्केटसाठी दिलेल्या परवानगीच्या विरोधात व्यापार बंद आंदोलन करण्यात आले.
---