मुलांना मुदतबाह्य जंतनाशकाचे वितरण
By admin | Published: December 6, 2015 12:50 AM2015-12-06T00:50:45+5:302015-12-06T01:37:50+5:30
इचलकरंजीतील अंगणवाडीतील प्रकार : आरोग्य केंद्रप्रमुखांना नोटीस
इचलकरंजी : गावभागातील अंगणवाडीमध्ये मुदतबाह्य जंतनाशके औषधे वितरीत केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. ही औषधे नगरपरिषदेकडील आरसीएच केंद्राकडून दिल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात आरसीएच केंद्रप्रमुख डॉ. यास्मिन पठाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
येथील जुना वैरण बाजारातील पालिकेच्या इमारतीत नगरपरिषद अर्बन आरसीएच नागरी आरोग्य केंद्र आहे. या केंद्रातून अंगणवाडीतील बालकांसाठी सेनझोल नावाचे जंतनाशक औषध वितरीत केले होते. हे वितरणअवधूत आखाडा, कलावंत गल्ली, त्रिशूल चौक, सारवान गल्ली व मुजावर गल्ली येथील अंगणवाड्यांमधून बालकांना देण्यात आली होती. ही औषधे मुदतबाह्य असल्याचे इम्रान मैंदर्गी या पालकाच्या निदर्शनात आले. त्यांनी या संदर्भात अन्य पालकांकडे चौकशी केली असता मुदत संपलेल्या २५ बाटल्या आढळून आल्या. औषधाची निर्मिती नोव्हेंबर २०१२ ची असून, आॅक्टोबर २०१४ रोजी त्याची मुदत संपली आहे. सुमारे १४ महिन्यांपूर्वी मुदत संपलेली असताना अशी औषधे बालकांना वाटल्याचा धक्कादायक प्रकाश घडल्याने पालिका प्रशासनास खडबडून जाग आली, तर काही अंगणवाड्यांतील सेविका व मदतनिसांनी ही बाब लक्षात आल्याने त्यांनी औषधांचे वितरण थांबविले.
आरसीएच केंद्राकडे काही पालकांनी विचारणा केली असता तेथे डॉ. पठाण यांनी पालकांशी हुज्जत घातली. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच उपमुख्याधिकारी पावन म्हेत्रे यांनी आरसीएच केंद्रात धाव घेतली. औषधांचा सीपीआर हॉस्पिटलकडून पुरवठा झाला आहे. मात्र, आलेली औषधे मुदतबाह्य नव्हती. या संदर्भात उपमुख्याधिकारी डॉ. म्हेत्रे यांनी दिलेली माहिती अशी, एचएस २६ आणि एचआर १९७ अशा दोन बॅचची जंतनाशक औषधे मिळाली. त्यापैकी एक औषध एचएस २६ बॅचची मुदत ३१ डिसेंबर २०१५ आहे. या बॅचची औषधे आरसीएचकडून पुरविली आहेत; मात्र एस १९७ बॅचची मुदत आॅक्टोबर १४ मध्ये मुदत संपलेली औषधे कोठून आली व ती वितरीत कशी झाली याचा अहवाल अधिकाऱ्यांकडून घेण्यात येईल आणि त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)