CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात पाच लाख रेशन कार्डधारकांना धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 04:39 PM2020-04-13T16:39:23+5:302020-04-13T16:42:35+5:30
जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून सोमवारपर्यंत ५ लाख १ हजार ३०० रेशन कार्डधारकांना धान्य वाटप करण्यात आले आहे. तर मोफत तांदळाचेही तीन दिवसांत ३२ हजार क्विंटल वितरण झाले आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून सोमवारपर्यंत ५ लाख १ हजार ३०० रेशन कार्डधारकांना धान्य वाटप करण्यात आले आहे. तर मोफत तांदळाचेही तीन दिवसांत ३२ हजार क्विंटल वितरण झाले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल, मे व जूनचे रेशनवरील धान्य लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी तीन महिन्यांचे मिळून ३६ हजार टन गहू, तांदूळ जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. यातील एप्रिलच्या १२ हजार धान्याचे वाटप हे १ एप्रिलपासून सुरू करण्यात आले.
जिल्ह्यातील १६०१ दुकानांमधून ‘अंत्योदय’ व ‘प्राधान्य’ कार्डधारकांना याचे वाटप केले जात आहे. जिल्ह्यातील एकूण ५ लाख ५७ हजार रेशन कार्डधारकांपैकी ५ लाख १ हजार ३०० कार्डधारकांना आतापर्यंत धान्य देण्यात आले असून, हे प्रमाण ९० टक्के इतके आहे. येत्या तीन ते चार दिवसांत शंभर टक्के वाटप होेण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के प्राधान्य व अंत्योदय कार्डधारकांना रेशनवरील धान्याचे वाटप झाले आहे. तर तीन दिवसांत ३२ हजार क्विंटल मोफत तांदूळ वितरित करण्यात आला आहे.
-दत्तात्रय कवितके,
जिल्हा पुरवठा अधिकारी