Kdcc bank election : जागा वाटपाचा तिढा; ‘अनुसूचित’च्या जागेसाठी विनय काेरे आग्रही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 11:29 AM2021-12-20T11:29:55+5:302021-12-20T11:35:33+5:30
आज, सोमवारी सकाळी पुन्हा बैठक घेऊन दुपारी साडेबारापर्यंत पॅनलची घोषणा केली जाणार आहे.
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यामंध्ये बैठकांचे सत्र सुरूच राहिले. अनुसूचित जाती-जमाती गटातील जागेवर आमदार विनय कोरे ठाम असून ही जागा सोडण्यास काँग्रेसच्या नेत्यांनी नकार दिल्याने जागा वाटपाचा तिढा कायम राहिला आहे. आज, सोमवारी सकाळी पुन्हा बैठक घेऊन दुपारी साडेबारापर्यंत पॅनलची घोषणा केली जाणार आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरुवातीच्या टप्प्यात झाला. मात्र, त्यात सर्वपक्षीय नेतेमंडळींना यश आले नाही. जागा २१ आणि नेते ३० झाल्याने जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत राहिला. विकास संस्था गटातून आपापल्या ताकदीवर लढण्यास नेत्यांनी सांगितले होते. उर्वरित नऊ जागांमध्येही ‘पतसंस्था’, ‘दूध संस्था’, ‘भटक्या विमुक्त जाती’, ‘इतर मागासवर्गीय’ या चार जागांवर अनेक जण आडून बसले होते.
मागील निवडणुकीत पतसंस्था जनसुराज्यला तर दूध संस्था राष्ट्रवादीकडे जागा होती. इतर दोन्हीही जागा काँग्रेसकडे होत्या. ‘पतसंस्था’ गटात आमदार प्रकाश आवाडे यांना संधी मिळाली. दूध संस्थातून भैया माने हे वर्षभर तयारी करत आहेत. अनुसूचित जाती-जमाती गटावर विनय कोेरे यांनी दावा केला आहे, येथून जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव माने यांना संधी देण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.
याबाबत रविवारी सायंकाळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व आमदार विनय काेरे यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. त्यानंतर मंत्री मुश्रीफ व आमदार पी. एन. पाटील यांची चर्चा झाली. कोरे यांनी अनुसूचित जातीच्या जागेवर हक्क सांगितला असला तरी काँग्रेस नेते ती सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.
भटक्या विमुक्त गटातून काँग्रेसने करवीरचे माजी पंचायत समिती सदस्य बबन रानगे यांचे नाव निश्चित केल्याचे समजते. महिला गटातील दुसऱ्या जागेवर शिवसेनेच्या गंधाळीदेवी संग्राम कुपेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. कुपेकर यांच्यासाठी शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी आग्रह धरल्याचे समजते.
शिवसेनेचा हबकी डाव
शिवसेनेने तिसरी जागा पदरात पाडून घेण्यासाठी शनिवारी बैठक घेऊन स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला होता. मुळात स्वतंत्र लढण्याची नेत्यांची मानसिकता नसल्याने त्यांचा हा ‘हबकी’ डाव होता.
महाविकास आघाडीचे पॅनल असे -
विकास संस्था गट
तालुका - नाव
कागल - हसन मुश्रीफ
करवीर - पी. एन. पाटील
पन्हाळा - विनय कोरे
शाहूवाडी - रणवीर गायकवाड
गगनबावडा - सतेज पाटील (बिनविरोध)
राधानगरी - ए. वाय. पाटील
भुदरगड - के. पी. पाटील
गडहिंग्लज - संतोष पाटील
चंदगड - राजेश पाटील
शिरोळ - राजेंद्र पाटील-यड्रावकर
हातकणंगले - अमल महाडिक
आजरा - सुधीर देसाई
प्रक्रिया गट - संजय मंडलीक व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर
दूध व इतर संस्था - भैया माने
पतसंस्था, बँका - प्रकाश आवाडे
इतर मागासवर्गीय - राजू काझी/ प्रकाश पाटील (जनसुराज्य)
भटक्या विमुक्त जाती- बबन रानगे
अनुसूचित जाती - राजू आवळे
महिला- निवेदिता माने व गंधाळीदेवी संग्राम कुपेकर