साखर कामगारांच्या बोनसमध्येही वाटमारी--स्पष्ट धोरणाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:49 AM2017-10-10T00:49:40+5:302017-10-10T00:50:45+5:30
कोल्हापूर : साखर कारखान्यांकडून कामगारांना दिल्या जाणाºया बोनसमध्ये काही कारखाना चालकांकडून वाटमारी होत असल्याचे चित्र आहे.
विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : साखर कारखान्यांकडून कामगारांना दिल्या जाणाºया बोनसमध्ये काही कारखाना चालकांकडून वाटमारी होत असल्याचे चित्र आहे. जाहीर बोनसमधील काही टक्के रक्कम काढून घेऊन कामगारांना बोनस देण्याचे प्रकार होतात. ही रक्कम संस्थाचालकांच्या नावे सुरू असलेली फौंडेशन, अध्यक्ष, आलिशान गाडीसाठी वापरली जाते. विशेष म्हणजे कामगारांना किती बोनस द्यावा, यासंबंधीचे स्पष्ट धोरणच अस्तित्वात नाही.
यशवंतनगर कराड येथे साखर कामगारांच्यावतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार झाला. त्यामध्ये ऊसाची एफआरपी वर्षाला वाढत असताना बोनसही चांगला मिळावा अशी मागणी कामगारांनी केली. त्यामध्ये पवार यांनी उसाचा दर वाढत गेला परंतु कामगारांचा बोनस काय वाढत नाय हे वागणं बरं नव्हं, असा चिमटा काढला व बोनस देण्याबाबत राज्य पातळीवर काहीतरी सूत्र निश्चित केले जावे असे सुचविले. त्यानुसार साखर संघ व उद्योगाच्या पातळीवरही तशा हालचाली सुरु झाल्या आहेत.
या कामगारांना बोनस मिळायलाच हवा, याबद्दल कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही; परंतु तो जास्तीत जास्त किती द्यावा, याचे काहीतरी धोरण निश्चित होण्याची गरज आहे. माजी केंद्रीय कामगारमंत्री र. कृ. खाडिलकर यांच्या काळात सर्वच कामगारांना कमीत कमी ८.३३ टक्के बोनस देण्याचा निर्णय झाला. एवढा बोनस म्हणजे किमान एक पगार होतो. तेवढा तरी किमान बोनस देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे ८.३३ पासून ते ४० टक्क्यांपर्यंत बोनस देण्याच्या घोषणा होतात. प्रत्यक्षात त्यातील काही टक्के रक्कम कपात केली जाते. एका कारखान्याकडे किमान ५०० च्या वर कायम व ३०० पर्यंत हंगामी कर्मचारी असतात. त्याशिवायही कंत्राटी पद्धतीवर काही कर्मचारी घेतले जातात. हंगामी व कायम कर्मचाºयांना १६ हजारांपासून ३५ हजारांपर्यंत पगार आहेत. हंगामी कर्मचाºयांना आॅफ सिझनमध्ये त्यांच्या पगाराच्या २९ ते ५२ टक्क्यांपर्यंत पगार मिळतो.
कामगारांना बोनस असो की पगार हा शेतकºयाला उसाची बिले ज्या प्रमाणात दिली जातात, त्या प्रमाणात दिला जावा, असा एक संकेत आहे. कागलच्या शाहू साखर कारखान्यात संस्थापक नेते दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी त्यासाठी एक ‘फॉर्म्युला’ निश्चित करून दिला. त्यानुसार हा कारखाना फक्त एफआरपी देईल त्यावर्षी ८.३३ टक्के बोनस देतो व जेव्हा एफआरपीच्या वर ऊसदर दिला जातो, तेव्हा वाढीव प्रत्येक शंभर रुपयांना २ टक्के बोनस दिला जातो
राज्यातील साखर उद्योग
राज्यात एकूण १७० साखर कारखाने आहेत. त्यापैकी ११९ सहकारी व उर्वरित खासगी कारखाने आहेत. ४५ लाख ऊस उत्पादक कुटुंबे असून, या उद्योगात वार्षिक ३५ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. या उद्योगात कारखान्यात नोकरी करणारे सुमारे अडीच लाखांवर कामगार आहेत. यातून राज्याला एक हजार ५३३ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. तसेच १००० मेगावॅट विजेची निर्मिती देखील होते.